मातीतील महत्त्वाच्या १२ घटकांची तपासणी करून आपल्या जमिनीत खतांची मात्रा किती असावी याची जिल्ह्यातील सुमारे ३६ हजार शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली. जमिनीची ही आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी महत्त्वपूर्ण असल्याने शेतकरी माती परीक्षण करून शेती करीत असल्याची सकारात्मक बाब यामुळे समोर आली आहे.
रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करून मृदा तपासणीवर आधारित अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित आणि कार्यक्षम वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून माती परीक्षण केले जाते. त्यानुसार जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करून शेतकऱ्यांना खतांची शिफारस केली जाते. जिल्ह्यात गेल्या एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलेल्या माती परीक्षणात सुमारे ३६ हजार शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात आली असून त्यांना खत वापरण्याची मात्रा निश्चित करून देण्यासाठीची शिफारस करण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीची आरोग्य तपासणी म्हणजेच माती परीक्षण केले जाते. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेंतर्गत ३६ हजार नमुने यंदा घेण्यात आले होते. जमिनीत घेण्यात येणारे पीक तसेच सध्याची जमिनीची सुपीकता आणि पोत कसा आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी माती परीक्षण केले जाते. जमिनीमध्ये किती मूलद्रव्ये तसेच अन्न द्रव्य अपेक्षित आहेत. पिकासाठी किती प्रमाणात खत, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, न्यूरोट ऑफ पॉटेश अपेक्षित आहेत याची शिफारस आरोग्य पत्रिकेत केली जाते. याचा लाभ शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकासाठी होत आहे..
दोन वर्षांसाठी पत्रिका सांगणार जमिनीचे आरोग्य
रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत असल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर झाला आहे. जमिनीचे आरोग्यही त्यामुळे बिघडले आहे. मृद आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन वर्षांपर्यंतचे जमिनीचे आरोग्य या पत्रिकेवरून कळते. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत मृद आरोग्य पत्रिका ही योजना सन २०१५ पासून राबविली जाते.