फळांचा राजा असलेल्या आंब्याची प्रतिडझन किंवा प्रतिकिलो सर्वात जास्त किंमत किती असेल? असा प्रश्न विचारला तर बुद्धीला कितीही ताण दिला तरीही तो आकडा हजारांमध्येच असेल, असे उत्तर हमखास मिळेल; पण जबलपूरमधील आंब्याने मोठा विक्रमच केला आहे. तेथील संकल्प परिहारच्या आमराईतील मियां जातीचा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिकिलोला चक्क अडीच लाख रुपयांना विकला जात आहे.
या आंब्याच्या सुरक्षेसाठी तितकाच मोठा जामानिमा आहे. आमराईला मोठे कुंपण आहेच; त्याशिवाय ११ श्वान तिथे कायम पहारा देत असतात. या परिसरात ५०० सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच लाख रुपये प्रतिकिलो या दराने विकल्या जाणाऱ्या या मियां जातीच्या आंब्याची भारतीय बाजारपेठेत मात्र ५००० ते २१००० रुपये प्रतिकिलो किंमत आहे. जबलपूरला नर्मदा नदीच्या किनारी असलेल्या या आमराईत तो उपलब्ध आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर संकल्प परिहारने भर दिला आहे.
आमराईत जपानच्या 'टाईयो नो टमँगो' या दुर्मीळ व अतिशय महागड्या आंब्यांचीही झाडे आहेत. जपानच्या बाजारपेठेत या आंब्याची किंमत प्रतिकिलो २.५० लाख रुपये आहे. जबलपूर चरगवां रोडवर तिलवारापासून ७ कि.मी. अंतरावर संकल्प सिंह यांच्या मालकीची साडेचार एकरांची आमराई आहे.
आमरायांमध्ये तब्बल २४ जातींचे आंबे
संकल्प परिहारच्या आमरायांमध्ये २४ जातींचे आंबे आहेत. त्यामध्ये आम्रपाली, मल्लिका, हापूश, केसर, बादाम, दशहरी, लंगडा, चौसा, सफेदा बॉम्बेग्रीन, टाईयो नो, टमँगो, मियाजाकी, ब्लॅक मँगो, जम्बो ग्रीन, जॅपनीज, ड्रॅगन, यूएसए सक्सेसन, गुलाब केशर, हुस्नेआरा, हल्दीघाटी, गुलाब खास, गौरजीत, कोकिला, आर्का, अनमोल, पुनीत, आदी जातीच्या आंब्यांचा समावेश आहे. नर्मदा किनारी असलेल्या खडकाळ जमिनीवर संकल्प परिहारने या आमराया विकसित केल्या आहेत.