डाळिंबाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. विविध पोषक घटकांचा स्रोत म्हणून डाळिंब ओळखले जाते. डाळिंबामध्ये विविध पोषक घटक, खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
प्रामुख्याने यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, अँथोसायनिन्स, प्युनिकिक ॲसिड, एलाजिटानिन्स, अल्कलॉइड्स, फ्रुक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज तसेच लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम ही खनिजे मुबलक प्रमाणात असतात. डाळिंबामध्ये ॲन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो. डाळिंबाच्या रसाच्या सेवनामुळे हृदयाचे कार्य सुधारते. हृदयरोगापासून बचाव होतो. तसेच कर्करोग पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.
डाळिंब सेवनाचे फायदे
१) डाळिंब थकवा दूर करणारे आहे.
२) अतिश्रम, प्रवास, तापानंतरचा येणारा थकवा यासाठी डाळिंबाचे दाणे किंवा रस फार उपयोगी पडतात. त्याने उत्साह वाढतो.
३) दाडीमादी घृत, दाडीमाष्टक चूर्ण अशी अनेक औषधे डाळिंबापासून तयार केली जातात, पण प्रत्येक व्याधीनुरूप त्याची मात्रा वेगळी असल्याने त्यानुरूप प्रमाण ठरवावे लागते. शिवाय काही औषधांत साखरेचे प्रमाणही असते.
४) शुगरचा त्रास असताना अशी औषधे विचारपूर्वक योजावी लागतात. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत.
५) डाळिंबाच्या फळाच्या सालीप्रमाणे त्याच्या मुळाची सालही औषधी असते. पोटातल्या जंतासाठी वावडिंगाबरोबर मुळाची साल पाण्यात उकळून प्यायल्यास चांगला फायदा होतो.
६) याचाच अर्थ सर्व पित्तप्रकृतीच्या, उष्णतेचा त्रास असणाऱ्यांसाठी डाळिंब हे वरदान आहे. कोणत्याही जातीचे डाळिंब असले तरी उपयुक्तच असते.
७) गर्भारपणामध्ये, सुतिकावस्थेतही डाळिंब आईसाठी आणि बाळासाठी उत्तम कार्य करते. शहाळे, लिंबू सरबत याला डाळिंबाचा रस हा उत्तम पर्याय आहे. फक्त ते गोड आणि व्यवस्थित पिकलेले रसदार असायला हवे.
८) महिलांना एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय मुलांचे संगोपन, कुटुंबाची काळजी या महत्त्वाच्या गोष्टी असतातच. अशावेळी दमछाक होऊन आलेला शीण कमी करण्यासाठी डाळिंब जरूर खावे
डाळिंब फळाचे महत्व (Benefits of Pomegranate Fruit)
- शरीरातील वात आणि कफाचे त्रास कमी होतो.
- हातपायांची आग होणे, अंगाची आग होणे, मूत्रविसर्जनावेळी जळजळ होणे आदी विकारांसाठी गुणकारी आहे.
- हृदयाच्या विविध आजारांसाठी डाळिंब बिया गुणकारी असतात.
- लहान-मोठ्या आतड्यांच्या पेशींच्या आकुंचन-प्रसरणाचे कार्य सुरळीत ठेवण्याचे कार्य पूर्ण पिकलेले डाळिंब फळ करते.
- डाळिंबाच्या मुळ्या या जंतुनाशक आहेत.
- डाळिंबाची साल आणि बियांचे चूर्ण वाताच्या आणि कफदोषावर गुणकारी आहे.
- अपक्व डाळिंब फळांचा रस पचनास उपयुक्त मदत करतो.
- उलट्यांच्या त्रासामध्येही डाळिंब फायदेशीर ठरते.
- डाळिंबाच्या नियमित सेवनाने मेंदूचे आजार, मूत्रपिंडाचे विकार उद्भवत नाहीत.
- डाळिंबाच्या फळाची साल, फूल, धणे, मिरी किंवा दालचिनी यांचे मिश्रण अतिसारावर गुणकारी आहे.
- पिकलेल्या फळातील बिया आणि रस पोटातील वायुदोष कमी करण्यास मदत करतात
डाळिंब रसाचे फायदे (Benefits of Pomegranate Juice)
- गोड डाळिंबाचा रस हे तृप्त करणारे पेय आहे. अशक्तपणामध्ये डाळिंब रसाचे सेवन करावे.
- डाळिंबाचा रस पित्तशामक, रोगप्रतिकारक आहे.
- डाळिंब रसाच्या सेवनामुळे भूक वाढते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
- खडीसाखर आणि डाळिंब रस यांचे सेवन केल्यास पोटातील जळजळ, आंबट ढेकर आणि लघवीवेळी होणारी आग कमी होते.
- ताप अधिक वाढल्यास घशातील कोरड, लघवीचा त्रास आणि जळजळ कमी करण्याकरिता डाळिंबाचा रस उपयुक्त आहे.
- डाळिंब रसाचे सेवन केल्यास त्वरित ताजेतवाने वाटते.
- यकृत, हृदय व मेंदूचे आजार कमी होतात व कार्यक्षमता वाढत.
- अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब रस गुणकारी आहे.
- डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.
- शरीरातील उष्णता कमी होते.
- डोळे येणे या संसर्गजन्य आजारात जास्त प्रमाणात डोळ्यांचे जळजळ होते. अशावेळी डाळिंब रसाचे २ थेंब डोळ्यात टाकल्यास आराम मिळतो.
- उच्च रक्तदाबावर डाळिंब रस गुणकारी मानला जातो.
- डाळिंब रस कफनाशक आहे. रसातील टॅनिन व अॅक्झालिक आम्ल कफनाशक आणि अनेक व्याधींवर गुणकारी आहे.
डाळिंब फळातील पोषक घटकांचे प्रमाण (घटकद्रव्ये प्रति १०० ग्रॅम)
१.पाणी - ७८%
२.प्रथिने - ०.६%
३.स्निग्ध पदार्थ - ०.१%
४.कर्बोदके - १४.५%
५.तंतुमय पदार्थ - ५.१%
६.खनिजे - ०.७%
७. कॅल्शिअम - १० मिलिग्रॅम
८.लोह - ०.२ मिलिग्रॅम
९.जीवनसत्त्व क - १४ मिलिग्रॅम
आयुर्वेदामध्ये डाळिंबाला विशेष महत्त्व आहे. विविध औषधांच्या निर्मितीसाठी डाळिंबाचा वापर करण्यात येतो. डाळिंब फळ, ज्यूस, मुळे, फुले, बियांचे तेल, खोडाची साल आणि दाण्यांचा वापर वेगवेगळ्या आजारांमध्ये उपचार पद्धतीसाठी केला जात असे.
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर