Join us

दररोजच्या आहारात आरोग्यदायी रानभाज्यांची असेल साथ तरच असेल आरोग्य दमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:00 PM

रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. यासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर गरजेचा आहे.

रानभाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. दिवसेंदिवस शेतातून रानभाज्या नामशेष होत असल्या तरी ग्रामीण भागात आजही रानभाज्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. यासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर गरजेचा आहे.

रानभाज्या खा, ठणठणीत राहा

निरोगी आणि आरोग्याला पोषक सर्व घटक मिळत असल्याने पालेभाज्या दैनंदिन आहारात असणे गरजेचे आहे. रानभाज्या खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढवते व पोषक घटक मिळतात. त्यामुळे रानभाज्या खा आणि ठणठणीत राहा, असे बोलले जाते.

तांदुळजा : तांदुळजा ही एक गावाकडची लोकप्रिय अशी रानभाजी आहे. शरीराला 'सी' जीवनसत्त्व मिळावे म्हणून तांदुळजाची भाजी खावी असे सांगितले जात. जर कुणाला गोवर, कांजण्या झाल्या किंवा खूप ताप, शरीरातील उष्णता कमी करावयास तांदुळजा उपयुक्त असतो.

करडी : भूक वाढवते, सर्दीला आराम देते. शरीरावर सूज आली असेल तर त्या जागी लावल्यास सूज कमी होते. करडीच्या भाजीचे मोठ्या प्रमाणावर आरोग्यदायी फायदे आहेत.

पाथरी : ही रानभाजी शेतात सहज कुठेही उपलब्ध होते. खाण्यासाठी थंड असते. पित्ताचा त्रास कमी होऊन आराम मिळतो. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आरोग्यासाठी फायदेशीर भाजी आहे.

माठाची भाजी : थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.

अंबाडी : अंबाडीच्या भाजीत कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, झिंक, जीवनसत्त्व 'अ' आणि 'क' अशा पोषक घटकांसह खनिजांचा उत्तम स्त्रोत आहे. तसेच उत्तम प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिडच्या उपलब्धतेमुळे रक्तवर्धन होते. डोळे, केस, हाडांसाठी तसेच रक्तदाब नियंत्र- णासाठी ही भाजी उपयुक्त आहे.

पाऊस वेळेवर, रानभाज्या मिळतील खायला

यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर आल्याने आपल्या शेतात दुर्मीळ असलेल्या व आपल्या नजरेस न पडणाऱ्या; पण आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या रानभाज्या खायला मिळणार आहेत.

रानभाज्यांसह इतर पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पौष्टिक घटक असतात. भरपूर जीवनसत्त्वांमुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत होते. त्यामुळे दैनंदिन आहारात पालेभाज्यांसह रानभाज्या खाणे आरोग्याला पोषक आहेत. - डॉ. चंद्रकात वाल्हेकर, आहारतज्ज्ञ, कडा जि. बीड.

हेही वाचा - खजुराचे पोषक तत्वे वाचून तुम्हीही म्हणाल; अबब अवघ्या एका खजुराचे किती हे गुणधर्म

टॅग्स :हेल्थ टिप्सशेतीभाज्याशेती क्षेत्रफळे