अरुण बारसकर
सोलापूर : शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला आणून त्यांचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील ३५ साखर कारखान्यांची साखर आयुक्तांकडे सुनावणी झाली आहे.
शेतकऱ्यांचा ऊस आणून दोन ते तीन महिने झाले तरी पैसे देण्याचे नावही साखर कारखाने घेत नसल्याची वस्तुस्थिती आहे. राज्याचा साखर हंगाम अखेरला आला असून, साखरपट्ट्यातील (पश्चिम महाराष्ट्र) साखर कारखाने केव्हाच बंद झाले आहेत.
काही बोटांवर मोजण्याइतके साखर कारखाने सुरू असल्याचे दिसत आहे. ऊस उत्पादकांचे पैसे थकविणाऱ्या कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत.
साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे ६० टक्क्यांपेक्षा अधिक एफआरपी थकबाकी असलेल्या राज्यातील साखर कारखान्यांची सुनावणी झाली आहे.
तत्कालीन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी तब्बल ९५ साखर कारखान्यांची एफआरपी थकविल्याने सुनावणी मागील महिन्यात झाली होती.
त्यानंतर बऱ्याच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत. त्यानंतरही शेतकऱ्यांचे देय असलेल्यापैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम थकविणाऱ्या कारखान्यांची सुनावणी झाली आहे.
सोलापूरची आघाडी...
सोलापूर जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांकडे ५३४ कोटी, तर धाराशिव जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे २६ कोटी ५० लाख असे १७ साखर कारखान्यांनी ६३० कोटी ३९ लाख रुपये एफआरपीचे थकविले आहेत. साखर विक्रीचा दर चार हजार रुपयांपर्यंत गेला तरी साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे देत नाहीत व हे प्रमाण राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
एफआरपी कायद्यानुसार साखर कारखान्यांनी १४ दिवसांत शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देणे अपेक्षित आहे. पैसे थकविल्याने प्रादेशिक सहसंचालकांनी नोटीस देऊन सुनावणी घेतली आहे. त्यानंतरही पैसे थकविल्याने सुनावणी घेतली. आता पुढील कारवाई होईल. - सिद्धाराम सालीमठ साखर आयुक्त, पुणे
अधिक वाचा: Us Galap : मागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदा या जिल्ह्यांत ऊस गाळपात मोठी घट