Join us

जळगाव जिल्ह्यात रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

By बिभिषण बागल | Published: July 18, 2023 2:45 PM

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.

जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग इ. पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या.

या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव तालुक्यातील वडली येथे कृषी केंद्रास भेट देऊन सदरील रासायनिक खतांची विक्री बंदची नोटीस देऊन खताचे नमुने संकलित करण्याचे आदेश दिले व शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड या गावात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन रासायनिक खताच्या वापरामुळे झालेल्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.

कोणतीही कंपनी अथवा विक्रेता शेतकऱ्यांची फसवणूक करताना आढळल्यास अशा सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून अहवाल २४ तासात दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत‌.

अशा गोष्टी टाळण्यासाठी कृषि निविष्ठा खरेदी करताना व वापरताना घ्यावयाची काळजी:

  • निविष्ठा खरेदी करताना त्या खात्रीशीर व नामवंत कंपनीच्या खरेदी कराव्यात.
  • खरेदी करताना खतांची पोते, बॅगवरील माहिती लेबल क्लेम जरुरू वाचावे.
  • निविष्ठा खरेदीची पावती घेणे व ती जपून ठेवणे जरुरीचे आहे.
  • निविष्ठा पॅकींग फोडल्यावर आपणास काही भेसळ आढळल्यास ते न वापरता विक्रेत्याच्या व निविष्ठा व गुणनियंत्रण कृषि विभाग यांच्या निदर्शनास आणून देणे जरुरीचे आहे.
  • शिफारशीत दिल्याप्रमाणेच खतमात्रा देणे आवश्यक आहे अतिवापरामुळे पिंकावर त्याचा अनिष्ठ परिणाम होवू शकतो.
टॅग्स :शेतीखतेलागवड, मशागतपेरणी