Join us

मराठवाड्यात ४० मंडळांत अतिवृष्टी पिकांचे नुकसान; जायकवाडीचे आणखी ८ दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 9:22 AM

मराठवाड्यातील (Marathwada) ४७ मंडळांना परतीच्या पावसाचा (Rain) तडाखा बसला. शनिवारी रात्री ११ वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्रीपर्यंत जोर कायम होता. विभागात ३१.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. ४० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वरूड काजी आणि पिसादेवी या मंडळात १२३ मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

मराठवाड्यातील ४७ मंडळांना परतीच्या पावसाचा तडाखा बसला. शनिवारी रात्री ११ वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्रीपर्यंत जोर कायम होता. विभागात ३१.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. ४० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वरूड काजी आणि पिसादेवी या मंडळात १२३ मि. मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर शहरात ७० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस बरसला. यामुळे शहरी भागात झाडे उन्मळून पडण्यासह अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले. जालना जिल्ह्यातील १०, लातूर १, नांदेड १०, परभणी २ व हिंगोली जिल्ह्यातील २ मंडळात पावसाने दाणादाण उडविली. विभागात रविवारी सकाळपर्यंत २९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत विभागात ११३ टक्के पाऊस झाला आहे. ६७९ मि. मी. च्या तुलनेत आजवर ८७५ मि. मी. पाऊस झाला आहे.

जिल्हानिहाय झालेला पाऊस

छ. संभाजीनगर - ४५जालना - ४४हिंगोली - ३८नांदेड - ३३परभणी - २६लातूर - २० बीड - १३ धाराशीव - ०९ सर्व आकडे मि.मी.मध्ये

नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा

नांदेडात पंधरा दिवसांपासून वातावरणातील तापमानात वाढ झाल्यामुळे उकाड्याचाही त्रास सहन करावा लागत होता. असे असताना शनिवारी रात्री १२:०० वाजताच्या सुमारास नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

वादळी वाऱ्यासह तब्बल दोन ते अडीच तास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीसाठी आलेल्या सोयाबीनला तर वेचणीसाठी आलेल्या कापसाची बोंडेही काळवंडली आहेत. पावसामुळे काहींच्या घरातही पाणी शिरले. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून शेतात ढीग मारून ठेवले आहे. आधीच सोयाबीनचे भाव चार हजार रुपयांच्या आत असताना काळवंडलेल्या सोयाबीनला आणखी कमी दर मिळतील. शेतकऱ्यांनी खत, बियाण्यासाठी टाकलेला खर्चही वाया जाण्याची भीती आहे.

परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस

परभणी : शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट सुरु होता. त्यामुळे विविध ठिकाणी नदी-नाल्यासह ओढ्यांना पार्णी आल्याने सखल भागात पाणी साचले होते. रात्री आठच्या सुमारास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दमदार पाऊस सुरू झाला.

परभणी शहर परिसरात रात्री साडेदहा ते बारा या दीड तासाच्या कालावधीत मुसळधार पाऊस सुरू होता. यामध्ये पेडगाव मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. येलदरी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शिवाय निम्न दुधना प्रकल्पात वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याने शनिवारी रात्री प्रकल्पाचे टप्प्याटप्पाने दहा दरवाजे ०.५० मीटरने उघडून नदीपात्रात १६ हजार ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जायकवाडीचे आणखी ८ दरवाजे उघडले

पण येथील जायकवाडी धरणात ५ हजार ९०४ क्युसेकने पाण्याची आवक वेगाने सुरू असल्याने रविवारी दुपारी २ वाजता धरणाचे आणखी ८ दरवाजे उघडण्यात आले. आता एकूण १८ दरवाज्यांमधून १५ हजार ७२० क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली. जायकवाडी धरण शनिवारी सायंकाळी ६ वाजता १०० टक्के भरले. त्यानंतर धरणाचे २७ पैकी १० दरवाजे उघडून, त्यामधून ५ हजार २४० क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.

रविवारीही धरणात ५ हजार ९०४ क्युसेकने पाण्याची आवक वेगाने सुरू असल्याने आणखी ८ दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार दुपारी २ वाजता ८ दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर धरणाचे १८ दरवाजे १ फुटाने उघडून १५ हजार ७२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला. गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत.

टॅग्स :मराठवाडापाऊसमोसमी पाऊसहवामानशेतकरीशेतीशेती क्षेत्रजायकवाडी धरण