पुणे : राज्यात अजूनही मान्सूनच्या पावसाने काढता पाय घेतला नाही. परतीच्या पाऊसही नंदुरबार जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर खिळून आहे. तर राज्यात अजूनही मान्सूनचाच पाऊस बरसत आहे. मागील दोन आठवड्यापासून चालू असलेल्या पावसामुळे राज्यातील बिगरहंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील बिगरहंगामी झेंडू आणि कलिंगड पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी झेंडूची लागवड करतात. पण सलग दोन तासापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे झेंडूचे नुकसान झाले आहे. तर मोठ्या प्रमाणावर कलिंगडाचे बागही पावसामुळे वाया गेले आहेत.
पुण्यातील दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील केशव होले यांच्या अडीच एकर कलिंगडाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. अडीच एकरामध्ये त्यांनी दोन लाख रूपयांचा खर्च केला होता पण कलिंगड तोडणीच्या काही दिवस आधी आलेल्या पावसामुळे पीक वाया गेले आहे.
सलग दोन तासांपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे झेंडूच्या फुललेल्या फुलावर पाण्याचे थेंब साचतात आणि त्या फुलाला डाग पडतो. यामुळे ते फूल बाजारात विकले जात नाही. जोरदार पाऊस आला तर झेंडूची झाडे थेट जमिनीवर झोपतात. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या झेंडूच्या बागांचेही नुकसान झाले होते.
बिगरहंगामी कलिंगडाला दर चांगला मिळेल या आशेने कलिंगड लावले होते. यासाठी मल्चिंग, खते, फवारण्या व इतर खर्चापायी दोन लाखांचा खर्च केला होता. पण पावसामुळे दोन लाख पाण्यात गेले आहेत.
- केशव होले (प्रगतशील शेतकरी, बिरोबावाडी, ता. दौंड, जि. पुणे)