मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरासह मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ३ हजार ६७५ गावांतील सुमारे १५ लाख ६१ हजार ७१ शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला.
यात सर्वाधिक ९५ टक्के जिरायत क्षेत्रफळ आहे. १२ लाख ४१ हजार ९६७ हेक्टरवरील पिके सध्या पाण्यात आहेत. यात ३,६७५ गावे बाधित झाली आहेत. त्यामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लहान-मोठी मिळून ६०९ जनावरे दगावली आहेत. तर १२ जणांचा वीज पडून, पुरात वाहून मृत्यू झाला आहे. १ हजार २२२ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. तर ११५ पक्की घरे पावसामुळे बाधित झाली आहेत. १३२ जनावरांचे गोठे पावसामुळे वाहून गेले आहेत. मराठवाड्यात १ सप्टेंबरपासून झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
नुकसानीचे पंचनामे
३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे १ लाख हेक्टरवर नुकसान झाले. शेतीसह इतर नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया विभागीय महसूल व कृषी यंत्रणेने हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे राजकीय नेत्यांचे नुकसान पाहणीचे दौरे सुरू आहेत.
जिल्हा | बाधित शेतकरी | नुकसान हेक्टरमध्ये |
छत्रपती संभाजीनगर | ६४,६९९ | ४,५०,७२ |
जालना | २,५७,४३५ | २,३२,९७२ |
परभणी | ४,२८,२२३ | २८७,८९२ |
हिंगोली | २,७३,११८ | २,५८,८९८ |
नांदेड | ४,४१,३४४ | ३,३४,९८५ |
बीड | ८४,६१८ | ७३,१९४ |
लातूर | ८,६४२ | ५,९५३ |
एकूण | १५,६१,०७१ | १२,४१,९६७ |