Join us

Heavy Rains: अतिवृष्टीचा मराठवाड्यातील ११.६७ लाख हेक्टरला फटका; शेती पिकांचे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 10:58 AM

गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका पिकांना सर्वाधिक बसला आहे. (Heavy Rains)

गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्याने ११ लाख ६७ हजार २७० हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक ९० टक्के नुकसान कोरडवाहू जमिनीवरील पिकांचे झाले आहे.

मराठवाड्यात जून ते ऑगस्टदरम्यान केवळ रिमझिम पाऊस सुरू होता. मुसळधार पावसाअभावी लहान, मोठी धरणे कोरडी होती. यामुळे प्रत्येक जण मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत होता. मागील महिन्यापर्यंत पडलेला रिमझिम पाऊस पिकांसाठी उपयुक्त होता.

मराठवाड्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. त्यापाठोपाठ कापूस आणि मका पीक घेतले जाते. सोयाबीनला आता शेंगा, तर कापसाला कैऱ्या (बोंडे) लागलेली आहेत. मक्यानेही तुरे टाकल्याने शेतकरी खुश होता. महिनाभरात सोयाबीन, मका पिकाची काढणी सुरू होणार आहे. 

मात्र, मागील चार दिवसांपासून आठही जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. १०३ पक्क्या घरांची अंशतः पडझड झाली आहे.  हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ४७ घरे पडली आहेत. छत्रपती संभाजीनगर ३१, जालना ११, परभणी १०, बीडमध्ये ४ मालमत्तांची पडझड झाली आहे.

लहान-मोठी ५२३ जनावरे दगावली

मराठवाड्यात गेल्या दोन दिवस झालेल्या पावसामुळे ५२३ जनावरे दगावली. यामध्ये परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक २६४ जनावरांचा समावेश आहे. लहान २२४ तर २० मोठी दुभती जनावरे आहेत. तसेच ओढकाम करणारी २० जनावरे आहेत. हिंगोली जिल्ह्यात २२ लहान व ५२ मोठी दुभती जनावरे तर २७ ओढकाम करणारी, अशी १०१ जनावरे दगावली. जालन्यात ५३ लहान, १५ दुभती तर ५ ओढकाम करणारी, अशी ७३ जनावरे दगावली. नांदेडमध्ये १२ लहान. १८ मोठी दभती तर सात ओढकाम करणारी अशी ३७, बीड जिल्ह्यात ८ लहान, ६ मोठी दुभती तर ४ ओढकाम करणारी अशी १८, लातूर जिल्ह्यात एक मोठे दुभते, धाराशिव जिल्ह्यात २० लहान तर एक मोठे दभते, अशी २१ जनावरे दगावली.

११ सर्कलमध्ये अतिवृष्टी

काही ठिकाणी वादळी वारा वाहत असल्याने मका, बाजरी, ज्वारी अशी पिके आडवी झाली. मागील २४ तासांत मराठवाड्यातील ११ सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद. 

■ ११,३१,३२१ हेक्टर जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

■ १६,२२५ हेक्टर बागायती जमिनीवरील पिकांची नासाडी

■ १९,७२४ हेक्टरवरील फळबागांची हानी झाली आहे.

जळगावात युवतीचा नदीत पडून मृत्यू

जळगाव जिल्ह्यात पुलावरून पाय घसरून नदीत पडल्याने युवतीचा मृत्यू झाला. तर जामनेर तालुक्यात वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. जामनेरमध्ये वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरु आहे. गंगापूरला पुराचा वेढा. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पात मंगळवारी दोन मित्र शेतात जात असताना वाहून गेले.

कोणत्या जिल्हयात किती हेक्टर पिकांचे नुकसान ?

जिल्हापिकांचे क्षेत्र
छत्रपती संभाजीनगर४५,०७२
जालना१,७६,३६२
परभणी  २,८७,८९२
हिंगोली२,५८,८९८
नांदेड३,३४,९८५
बीड५८,२९२
लातूर५,७६८
एकूण११,६७,२७०

मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील ११ मंडळांत सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लोणी, कन्नड तालुक्यातील पिशोर, चिंचोली मंडळांत जोरदार पाऊस झाला. सोयगाव, सावळदबारा सर्कलमध्येही अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील पिंपरखेड, जलधारा, अर्धापूर मंडळात अतिवृष्टी झाली. परभणीतील जिंतूर तालुक्यातील आडगाव मंडळात तर हिंगोली जिल्ह्यातील अंबा, कुरुंदा हे मंडळ दमदार पावसामुळे जलमय झाले. विभागात आजपर्यंत १०२ टक्के पाऊस झाला आहे. ३ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत १५ मिमी पावसाची नोंद झाली.

१० जणांचा वीज पडून मृत्यू 

छत्रपती संभाजीनगरात पाच जणांचा वीज पडून, पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. जालना, बीड, लातूर प्रत्येकी १ तर हिंगोली जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसशेतकरीशेती