Join us

Herbicide prices: यंदाच्या खरिपात तणनाशकांच्या किंमती वाढल्या, उत्पादन खर्चही वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 1:08 PM

Herbicide and weedicide prices go up for this kharif season, यंदाच्या खरीप हंगामात तणनाशकांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढणार आहे.

खरीप हंगामाच्या (Kharif season)  तयारीला शेतकरी लागले असून मॉन्सूनचे आगमन राज्यात झाल्याची आनंद वार्ता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पुरेसा पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरण्यांच्या तयारीत आहेत. यंदा भारतीय हवामान विभागाने चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे.  त्यामुळे पीककर्जापासून तर बियाणे,  खते आणि औषधे खरेदीपर्यंतच्या तयारीला शेतकरी वेग देत आहेत.

एकीकडे शेतकऱ्यांमध्ये उत्साह असला तर यंदा अनेक कृषी निविष्ठांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्चही वाढणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी जाणवत आहे. बियाणे, खतांप्रमाणेच किटकनाशके आणि तणनाशके या निविष्ठा महत्त्वाच्या आणि आवश्यक मानल्या जातात. मजूर टंचाईमुळे अलीकडच्या काळात शेतकरी तणनाशकांना पसंती देत आहेत. मात्र यंदा तणनाशकांच्या (herbicide prices) किमती वाढल्या आहेत.

तणनाशकांचे आधीचे आणि आताचे दर (प्रतिलिटर)

ग्लायसिल - ३५०/४५०परसूट - ११००/१३५० सरगा सुपर - १३५०/१४०० साकेत - ८००/८५०

कसे होणार पिकांचे रक्षण? शेतशिवारांमध्ये तण अधिक प्रमाणात वाढल्यास त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर होतो. यामुळे सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. त्यामुळे तणाचा वेळीच नाश करणे अत्यावश्यक असते. असे असताना खत, बियाणे, शेतीउपयोगी औजारांचे दर वाढण्यासह तणनाशकाचे दरही वाढविण्यात आल्याने पिकांचे रक्षण नेमके कसे करायचे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

तुरीच्या बियाण्यांचे दरही वधारले

खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद यासोबतच तुरीची विक्रमी क्षेत्रावर लागवड केली जात आहे. यंदा तुरीच्या बियाण्यांचे दर चांगलेच वधारले असून शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या आर्थिक अडचणीत अधिकच भर पडली आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील आर्थिक बजेट विस्कळीत झाल्याचे बोलले जात आहे.

शेतीला लागणारे बियाणे, खते, कीटकनाशक व तणनाशकाचे दर नियंत्रणाबाहेर जात आहेत. त्यावर शासनाने विनाविलंब अंकुश लावून शेतकऱ्यांना आंध्र प्रदेश व तेलगणा राज्याप्रमाणे अनुदान थेट बँक खात्यात टाकून दिलासा द्यावा. - दिलीप मुठाळ, शेतकरी, वाशिम

खरीप हंगामातील पिकांना पावसाचे पाणी पूरक प्रमाणात मिळते. यासोबतच शेतशिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाची उगवण होते. ती पिकांसाठी धोकादायक असते. मात, तणनाशकाचे दर वाढल्याने खर्च आवाक्याबाहेर जात आहे. - प्रदीप इढोळे, शेतकरी, वाशिम

टॅग्स :खरीपकीड व रोग नियंत्रणशेतकरीशेती