Join us

मोसंबी पिकांच्या मदतीने उच्चशिक्षित तरुणाने केला कुटुंबाचा कायापलाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 8:32 PM

पारंपारिक पिकांना फाटा देत त्यांनी फळपीक लागवड करायचे ठरवले होते.

अवघ्या ३०-३५ घराचं शेतकरी कुटुंबाचं गाव असलेल्या चिंचखेडा ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील भालचंद्र डुबे यांची २५ एकर शेती आहे. या क्षेत्रात ते मोठा मुलगा बंडू यांच्या मदतीने कपाशी, मका, टोमॅटो, कांदा असे पिके घेतात. क्षेत्र मोठे असल्याने मजुरांची कमतरता देखील अधिक  भासायची म्हणून भालचंद्र डुबे यांनी २०१० साली एक एकर मोसंबीची लागवड केली. पुढे लहान मुलगा ईश्वर यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्यांनी देखील घरी शेतीला हातभार लावण्याचे ठरवले.

शेतीत पूर्णवेळ काम करत असतांना आलेल्या अनुभवातून सुधारणा करत ईश्वर यांच्या पुढाकाराने डुबे कुटुंबांची आज साडे सातएकर मोसंबीची बाग असून दोन मुले, सुना नातवंड अशा एकत्रित परिवाराच्या मेहनतीने शेतीची सर्व कामे पार पडतात. या बागेच्या उत्पन्नावर डुबे परिवाराने ट्रॅक्टर, दुचाकी, यांची खरेदी करत बागेच्या जिवावर मुलांचे लग्न केल्याचे भालचंद डुबे सांगतात. 

मोसंबी वाण व व्यवस्थापन डुबे यांच्या कडे न्यू शेलार जातीचे १२०० तर कॉटन गोल्ड ८०० झाडे असून १४ बाय १४ वर झाडांची लागवड केलेली आहे. यांना वार्षिक कोंबडी खत व शेणखतांचे आच्छादन केले जाते तसेच आंतरपीक म्हणून हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडले जाते. 

सिंचन व पाणी व्यवस्थापन मोसंबी बागेसाठी ठिबक सिंचन केले असून १ -१  एकर चे दोन शेततळे हे केवळ मोसंबी साठी असल्याचे तसेच २०१३ व २०१७ साली दुष्काळाच्या झळा सोसवत असतांना परिसरातून ३ ते ४ हजार दराने ट्रँकर द्वारे बागेला पाणी दिल्याचे ईश्वर डुबे सांगतात. 

मोसंबी उत्पन्न व खर्च रासायनिक खतांसोबत परिसरातून कोंबडी खत व तसेच विविध सेंद्रिय अर्काचा वापर करत असल्याने खर्च अवघा वार्षिक संपूर्ण बागेसाठी सरासरी दिड लाख रुपये येत असून मोसंबीच्या आंबिया बहार मधून गेल्या वर्षी २८ टन उत्पन्न मिळाले होते ज्यास २२-२३ रुपये दर मिळाला होता. ज्याचे सरासरी उत्पन्न ६ ते ७ लाख मिळाले होते. या वर्षी डुबे यांना ३५ ते ४० टन उत्पन्न अपेक्षित आहे. मोसंबीची तोड खरेदीदार व्यापारी यांच्याकडे असल्याने तसेच परिसरातून व्यापारी जागेवर मोसंबी खरेदी करत असल्याने विक्री सुलभ होत असल्याचे डुबे सांगतात.

- रविंद्र शिऊरकर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी