Pune : "भातशेतीचं वर्षभराचं गणित काढलं तर आमच्या घरात एका जणाला फक्त ५० रूपये रोज पडतो. त्यामुळं फक्त घरी खाण्यासाठी भात असतो, भात विकून जास्त पैसे मिळत नाहीत. यापेक्षा जास्त पैसे तर हिरड्याच्या विक्रीतून मिळतात." हे वाक्य आहेत सह्याद्रीच्या घाटात दुर्गम भागात राहणाऱ्या दीपक रढे या शेतकरी तरूणाचे. भातशेती ही पैशासाठी नाही तर पारंपारिक शेती म्हणून केली जाते असं दीपक सांगतात.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दुर्गम भागात राहणाऱ्या, वाड्यावस्त्या किंवा आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या लोकांचा प्रामुख्याने शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यांच्याकडे कमीजास्त प्रमाणात शेती आहे. या शेतीमध्ये खरीप हंगामात भात पीक घेतले जाते. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर आंबेमोहोर, रायभोग, इंद्रायणी या भाताची लागवड केली जाते. पण या भाताचे उत्पादन फक्त नावापुरतेच असते, भात विक्रीतून जास्त नफा होत नसल्याचं दीपक सांगतात.
हिरडा ही जंगली वनस्पती खऱ्या अर्थाने आदिवासी शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा आहे. हिरड्यासाठी शेतकऱ्यांना कोणताच खर्च करावा लागत नाही. ना हिरड्याची लागवड करावी लागते, ना त्याची कोणती देखभाल करावी लागते. खते, पाणी, फवारणी, औषधे काहीच नाही, त्यातून फक्त आपण उत्पन्न काढू शकतो. त्यामुळे हिरडा शेतकऱ्यांना फायद्याचा ठरतो.
हिरड्याचे दोन प्रकार असतात. एक बाळ हिरडा जो हिरवा असतो आणि दुसरा परिपक्व झालेला हिरडा. बाळ हिरड्याची विक्री केली तर जास्त नफा शेतकऱ्यांना होतो. या हिरड्याला १८० ते २०० रूपये किलोपर्यंतचा दर मिळतो. परिपक्व झालेल्या हिरड्याला २० ते ३० रूपये किलोचा दर मिळतो असं शेतकरी सांगतात.
हिरडा या वनस्पतीचा सामावेश फळपीक विमा योजनेमध्ये नाही. त्याबरोबरच हिरडा झोडण्यासाठी एखादा व्यक्ती झाडावर चढला आणि चुकून झाडावरून पडला तर शेतकरी अपघात विमा योजनेमध्येसुद्धा हिरडा या वनस्पतीचा सामावेश नाही. त्यामुळे हे शेतकरी विमा आणि इतर योजनेंच्या लाभापासून वंचित आहेत. अनेकदा शेतकऱ्यांनी यासाठी आंदोलने केले पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
घाटमाथ्यावरील ग्रामीण भागात रोजगाराची साधने किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत. भातशेतीतून चांगले उत्पन्न होत नाही. त्यामुळे हिरडा हे या शेतकऱ्यांसाठी प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत आहे.
आमच्याकडे साधारण हिरड्याची २०० पेक्षा जास्त झाडे आहेत. भातशेतीमध्ये जेवढे उत्पन्न होते त्यापेक्षा कितीतरी अधिक उत्पन्न या हिरड्याच्या विक्रीतून होते. त्यामुळे हिरड्यावर आमच्यासारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांचं अर्थकारण चालू आहे.
- दीपक रढे (शेतकरी, फळोदे, ता. आंबेगाव)