दिवाळीनंतर आपण शहराच्या ठिकाणी अनेक प्रदर्शने आणि महोत्सव भरल्याचं पाहिलं असेल. तर अनेकदा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाचे, शेतमालावर प्रक्रिया केलेल्या उत्पादनाचे, वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शने होत ् असतात. तर आता ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या फळे आणि धान्य महोत्सव भरवतील अशा शेतकऱ्यांसाठी पणन मंडळाकडून अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून फळे व धान्य महोत्सवावर अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. आंबा, संत्रा, मोसंबी, द्राक्ष यासारख्या हंगामी फळे तसेच धान्यांचे थेट उत्पादक ते थेट ग्राहक विक्री करण्यासाठी महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी पणन मंडळाकडून ही अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ कुणाला?
- राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या
- कृषी व पणनशी संबंधित असलेल्या सहकारी संस्खा शासनाचे विभाग
- शेतकरी उत्पादक कंपन्या
- पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था
योजनेची वैशिष्ट्ये
- महोत्सवाचा कालावधी किमान ५ दिवसांचा असणे आवश्यक आहे.
- महोत्सवास प्रतिस्टॉल २ हजार रूपये याप्रमाणे अर्थसहाय्य देय
- भौगोलिक मानांकन प्राप्त असल्यास प्रतिस्टॉल ३ हजार रूपये याप्रमाणे अर्थसहाय्य देय
- महोत्सवामध्ये किमान १० व कमाल ५० स्टॉलसाठी अर्थसहाय्य देय
- अगोत्सव आयोजनापूर्वी कृषी पणन मंडळाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक
- महोत्सवाच्या आयोजनासाठी प्रस्ताव पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक
ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे संपर्क करून प्रस्ताव सादर करावेत.