Join us

होळी सण विशेष; जपली जातेय शेणापासून गोवऱ्या बनविण्याची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 6:14 PM

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निमशहरी आणि ग्रामीण भागात आजही गोवऱ्याचे महत्व टिकून आहे.

होळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. तो पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निमशहरी आणि ग्रामीण भागात आजही गोवऱ्याचे महत्व टिकून आहे.

आकारमानानुसार गोवरीची किंमत आकारली जाते. किरकोळ बाजारात एका गोवरीची किंमत दहा रुपये आकारली जाते, अशी माहिती विक्रेते विलास गायकवाड यांनी दिली. शेतकरी कुटुंबात गोवऱ्या बनविण्याची पूर्वापार पद्धत आहे. ग्रामीण भागात गोवऱ्या तयार करण्याचे काम विशेषतः महिलाच करतात.

गोवऱ्या दीर्घकाळ टिकाव्यात, यासाठी त्या वाळल्यानंतर विशिष्ट पद्धतीने रचून रास केली जाते. आंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळ भागात आजही अशा रासी अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. मान्सूनपूर्व काळात शेतकरी गोवऱ्या विशिष्ट पद्धतीने रचून ठेवतो. त्यास 'कलवड' असे म्हणतात.

गोवऱ्याचे पाण्यापावसापासून संरक्षण व्हावे म्हणून 'कलवड' गवत व कामट्यांच्या साहाय्याने शेकारला जातो. साधारणतः दोन ते तीन महिने अगोदर होळीसाठी गोवऱ्या थापण्याचे काम सुरू होते. होळीच्या दिवशी आकारानुसार एका गोवरीची किमत साधारणतः ८ ते १० रुपये असते. बाजारात सध्या ८०० रुपये शेकडा नगाने गोवरी उपलब्ध आहे.

गोवऱ्या आता ऑनलाइन विक्रीसाठीही उपलब्धहोळीनंतरही गोवऱ्याची वर्षभर विक्री सुरू असते, गोवरी व्यवसाय पशुपालनाला पूरक आहे. या व्यवसायाला शासकीय अनुदान मिळाल्यास ग्रामीण भागातील महिलांना हक्काचा रोजगार मिळेल. चूल, बंब, भात शेतातील राब भाजणे यासाठी गोवऱ्या उपयुक्त आहेत. गोवऱ्या सहजासहजी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील वृक्षतोड थांबण्यास मदत होईल.

टॅग्स :होळी 2024शेतकरीशेतीऑनलाइनपाऊसपाणीमहिला