Join us

उन्हाळ्यात घरच्या काकड्यांचा गारवा, कुंडीतही लावता येईल वेल, या सोप्या टिप्स येतील कामी..

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 21, 2024 11:23 AM

राज्यात उन्हाचा कडाका आता वाढू लागला आहे. उन्हाळा अजून म्हणावा तसा सुरु झाला नसला तरी घामाच्या धारा, उकाडा आणि ...

राज्यात उन्हाचा कडाका आता वाढू लागला आहे. उन्हाळा अजून म्हणावा तसा सुरु झाला नसला तरी घामाच्या धारा, उकाडा आणि वाढत्या तापमानाला हळुहळु सुरुवात झाली आहे. या काळात जेवणात काकडीच्या सॅलडला अनेकजण पसंती देतात. उन्हाळ्यात शरीराचं तापमान सामान्य ठेवण्यासाठी आणि थंडावा देण्यासाठी काकडी लाभदायक मानली जाते. तसेच काकडी खाल्याने शरीरातील पाणीपातळीही कमी होत नाही. यात काकडी घरची असेल तर अजूनच चांगलं, नाही का? 

काकडीला तुम्हाला कुंडीतही लावणं सहज शक्य आहे. काकडीला उगवण्याचा योग्य कालावधी हा फेब्रुवारी आणि मार्च हाच आहे. आज आपण जाणून घेऊया काकडीला कुंडीत कसे लावले जाऊ शकते..

कुंडीत काकडी लावण्याआधी..

कुंडीत काकडीचा वेल लावायचा असेल तर सर्वात आधी चांगलं बीयाणं असणं फार गरजेचं आहे.  चांगलं बी तुम्हाला विकत आणावं लागेल. किंवा जर घरच्या काकडीच्या बीया वापरल्या तरीही चालू शकतील. 

घरच्या काकडीच्या बीया वापरायच्या असतील तर..

  • सर्वात आधी काकडीच्या बीया बाजूला काढून पेलाभर पाण्यात दोन तासांसाठी ठेवून द्या. असे केल्याने त्यातील आर्दता टिकून राहते. 
  • त्यानंतर या बीयांना ओल्या टिश्यू पेपरमध्ये किंवा पेपर टॉवेलमध्ये १२ तासांसाठी एखाद्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा. जेणेकरून त्या बीयांना अंकूर फुटेल. बरणी बंद करताना पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपरला पाण्याचा शिडकावा द्यायला विसरू नका. 
  •  बारा तासांनी बीयांना अंकूर फुटतील. आता या बीया मातीत लावण्यासाठी तयार असतील. मातीमध्ये शेणखत आणि रेती मिक्स करून कुंडी भरा.
  • काकडीच्या बीयांना २ ते ३ इंच खोल लावा. आणि कुंडी ऊन आणि सावली योग्य प्रमाणात असेल अशा जागी ठेवा.लागवडीनंतर दिवसातून एकदातरी बीयांना पाणी देणे गरजेचे आहे. साधारण आठवडाभरात काकडीचा वेल येण्यास सुरुवात होते.  
  • वेल बहरल्यावर साधारण १५ दिवसांनी मातीत शेणखत टाकून कीड लागू नये यासाठी फवारणी करा.  किंवा घरच्या घरी केवळ पानांना पाण्याच्या स्प्रेने शिडकावा द्यावा.
  • दोन- तीन महिन्यात वेलावर काकड्या येऊ लागतील. काकडी जेंव्हा मोठी होईल तेंव्हा दोरी किंवा लाकडाचा त्याला आधार द्यावा.
टॅग्स :बागकाम टिप्सशेती क्षेत्रभाज्यालागवड, मशागत