Join us

Crop Insurance : फळपीक विमा योजनेसाठी ३४४ कोटी मंजूर! पण केवळ 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 6:17 PM

संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ३), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई (आंबिया बहार) या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली आहे.

Pune: सरकारने या हंगामासाठी लागू केलेल्या फळपीक योजनेसाठी निधी मंजूर केला असून फळपीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. येणाऱ्या काळात आता शेतकऱ्यांनी विमा मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. २०२१-२२ आणि २०२३-२४ मधील आंबिया बहरामध्ये ज्या शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेसाठी अर्ज केला होता अशा शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (Horticulture Crop Insurance Scheme Latest Updates)

दरम्यान, शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबवली आहे.

कोणत्या पिकांसाठी विमा?राज्यात २०२१-२२, २०२२-२०२३ व २०२३-२४ या तीन वर्षांमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ३), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई (आंबिया बहार) या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषि विमा कंपनी या विमा कंपन्यांमार्फत विमा योजना राबवली आहे.  

अधिक माहितीनुसार २०२१-२२ व २०२३-२४ साठी भारतीय कृषि विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्याच्या हिस्साचे अनुदान वितरीत करण्याची मागणी कृषी आयुक्तालयाने केली होती. आंबिया बहार सन २०२१-२०२२ साठी २ लाख ७९ हजार ३९१ रूपये व सन २०२३-२०२४ साठी ३४४ कोटी ५९ लाख ८ हजार २४५ रूपये असा एकूण ३४४ कोटी ६१ लाख ८७ हजार ६३६ रूपये इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती. तर हा निधी राज्य सरकारने मंजूर केला असून केवळ २०२१-२२ आणि २०२३-२४ सालांतील आंबिया बहारासाठी वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.  

टॅग्स :पीक विमापीकशेतकरीमहाराष्ट्र