बार्शी : यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून मजल-दरमजल करत बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघाचा बार्शी तालुक्यात मुक्काम असून, शनिवारनंतर मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ढेंबरेवाडी तलावाजवळ वन खात्याच्या वतीने लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तो पुन्हा एकदा दिसून आला आहे.
त्यामुळे पांगरी परिसरातील घोळवेवाडी, चिंचोली, पांढरी, ढेंबरेवाडी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बार्शीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे यांनी केले आहे.
शनिवारी धाराशिव-बार्शीच्या सीमेवर असलेल्या येडशी अभयारण्य परिसरात हा वाघ आढळून आला होता. त्याअनुषंगाने वनविभाग सतर्क झाला असून, पुढे तो बार्शी तालुक्यात दाखल झाला आहे.
बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी, चिंचोली, घोळवेवाडी, चारे परिसरात कॅमेरे लावण्यात आले होते. शनिवारी ट्रॅप कॅमेऱ्यात हा वाघ आढळून आल्याने वनविभाग पूर्णपणे अलर्टवर आला होता.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी घोळवेवाडी येथील काही शेतकऱ्यांनी आमच्या भागात वाघ आढळून आल्याचे वन खात्याला कळविले होते. त्यानुसार वनखात्याने घोळवेवाडीतील तलावाजवळ लावलेले कॅमेरे काढून ढेंबरेवाडी तलावाच्या जवळ हे कॅमेरे बसवण्यात आले होते.
जेणेकरून हा वाघ पाणी पिण्यासाठी या तलावाकडे येईल, असा वनविभागाचा अंदाज होता आणि तो खरा ठरला. मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ढेंबरेवाडी तलावाच्या परिसरात हा वाघ पुन्हा एकदा आढळून आला आहे.
बार्शी तालुक्यातील नागरिकांनी विशेषतः पांगरी, पांढरी, ढेंबरेवाडी, चिंचोली, घोळवेवाडी या परिसरातील नागरिकांनी पूर्णपणे काळजी घेऊन दक्ष राहावे.
विशेषतः संध्याकाळी घराच्या बाहेर पड नये, असे आवाहनही वनविभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे. हा वाघ आढळून आल्यास कोणीही त्याला डिवचण्याचा देखील प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.
वनविभागाकडून संपर्क क्रमांक जाहीर
▪️वाघ आणि बिबट्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर किंवा हल्ला झाल्यास वनविभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
▪️नागरिकांना लवकर मदत मिळावी, या उद्देशाने वनविभागाने नियतक्षेत्रानुसार गावाचे नाव आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर प्रसिद्ध केले आहेत.
▪️धामणगाव, पांगरी, कोरेगाव, चिंचोली, वैराग, पानगाव या नियतक्षेत्रातील ७० गावांचा या यादीत समावेश आहे.
वाघ दिसल्यास कॅमेऱ्यात ऑटोमॅटिक क्लिक
▪️वनविभागाच्या वतीने बसवलेल्या या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघ दिसून आल्यास त्याचा ऑटोमॅटिक फोटो क्लिक होतो.
▪️त्यामुळे प्रत्यक्षात त्या कॅमेऱ्यात जाऊन ते चेक करण्याची गरज नाही.
▪️वाघ आढळून आल्यास तत्काळ वन अधिकाऱ्यांच्या मोबाइलमध्ये हा फोटो सेंड होतो व त्यानुसार हा वाघ आढळून आल्याचे अलका करे यांनी सांगितले.
▪️वनविभागाला हा वाघ आढळून आला असला तरी बिबट्या देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघ हा कधीतरी असाच आढळून आलेला आहे.