राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एन.सी.डी.सी.) यांच्याकडून राज्यातील साखर कारखाने साखर माल तारण कर्ज उपलब्ध करून घेतात. प्रतिक्विंटल ३,१०० रुपये इतका असून, त्यामधून पंधरा टक्के मार्जिन मनी रक्कम वजा करून फक्त २,६३५ रुपये प्रतिक्विंटल इतके कारखान्यांना कर्ज उपलब्ध होते. ३,१०० रुपयांऐवजी ३,४०० ते ३,५०० रुपयांपर्यंत साखर माल तरण कर्जावरील मूल्यांकन दर वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच एनसीडीसीचे कार्यकारी संचालक बन्सल यांना निवेदन देण्यात आले.
दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना भेटून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी एनसीडीसी कडील साखरेच्या मूल्यांकन दरामध्ये वाढ करणेबाबत पत्राद्वारे विनंती केली. राज्यातील साखर कारखान्यांना दि महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक त्याचबरोबर राष्ट्रीयीकृत बँकांकडून साखर माल तारण कर्जावरील उचलचा दर प्रति क्विंटल ३,४०० ते ३,५०० रुपयांपर्यंत आहे.
अधिक वाचा: ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात नंबर एक, इथेनॉल निर्मितीत होणार वाढ
तसेच साखरेचा बाजारभाव प्रति क्विंटल ३,५०० ते ३,७०० रुपयांपर्यंत आहे. एनसीडीसीकडून साखर माल तारण कर्जावरील मिळणारा उचलचा दर कमी आहे. साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम व तोडणी वाहतूक खर्चासाठी रक्कम कमी उपलब्ध होत आहे. त्यामुळे मूल्यांकन वाढल्याने साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे, असेही परिचारक यांनी पत्रात म्हटले आहे.
पांडुरंग कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी साखर मूल्यांकन दर वाढवण्यासाठी प्रयल करीत आहेत. एनसीडीसीकडून साखर माल तारण कर्ज घेणाऱ्या सर्वच साखर कारखान्यांचा निधी उपलब्धतेसाठी फायदा होणार आहे. - डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना, श्रीपूर