Join us

कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडी कशा ओळखाल ?

By बिभिषण बागल | Published: July 29, 2023 11:30 AM

भारतामध्ये कपाशीवर २५२ किडींची नोंद आहे.  तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत.

भारतीय कापूस उत्पादकता विविध कारणांमुळे सर्वात कमी आहे, त्यापैकी विविध किडीमुळे होणारे नुकसान हे उत्पादन मर्यादित करणारे प्रमुख कारण आहे. भारतामध्ये कपाशीवर २५२ किडींची नोंद आहे.  तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. या किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टळेल आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होईल.

तुडतुडे

  • ओळख : प्रौढ २ मि.मी. लांब, पाचरीच्या आकाराचे, फिकट हिरवे असून समोरच्या पंखाच्या कडेजवळ एक काळा ठिपका असतो. चालताना ते तिरके चालतात. हिवाळयामध्ये यांचा रंग थोडा लालसर होतो. अंडी लांबट, पिवळसर पांढरी असतात. पिल्ले पांढरट-फ़िकट हिरवे, पंखहिन असून ते तिरके चालतात.
  • नुकसानीचा प्रकार : प्रौढ तुडतुडे आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून त्यातील रस शोषण करतात.  अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्यांच्या कडा मुरगळतात, परिणामी झाडाची वाढ खुंटते.  अशा झाडांना चाफे, फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात लागतात. 
  • प्रादुर्भावाचा कालावधी (सक्रियता) : तुडतुडयाचा प्रादुर्भाव पीक १५ ते २० दिवसाचे झाल्यापासून ते बोंडे फुटेपर्यंत आढळून येतो.  परंतु ऑगस्टचा दुसरा पंधरवाडा आणि सप्टेंबरचा पहिला पंधरवाडा या काळामध्ये सर्वात जास्त तुडतुडयांची संख्या आढळून येते. कपाशीचा हंगाम झाल्यावर तुडतुडे इतर पर्यायी खाद्य वनस्पतीवर उपजिविका करतात.
  • पोषक घटक : तापमान, आर्द्रता व पर्जन्य वाढल्यास व सुर्यप्रकाश कमी असल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची उघडीप पडत असते. या काळामध्ये तापमानामध्ये काही प्रमाणात वाढ होते व ढगाळ वातावरण असते. अशा प्रकारचे वातावरण तुडतुडयाच्या वाढीस पोषक वातावरण आहे. याबरोबरच कपाशीची उशिरा पेरणी आणि नत्रयुक्त खतांचा गरजेपेक्षा जास्त वापर या किडीच्या वाढीस मदत करतो.
  • आर्थिक नुकसानीची संकेत पातळी : २ ते ३ पिल्ले/पान

फुलकिडे

  • ओळख : प्रौढाची लांबी २ मि.मी. असून समोरील पंख दुभंगलेले असतात. रंगाने फिकट पिवळा किंवा तपकिरी रंगाचा दिसून येतो तर आकार लांबट असतो. अंडी पांढरट ते फिकट पिवळसर असून वरच्या बाजूस हे किंचित निमुळते असतात तर यांचा आकार चवळीच्या बियासारखा असतो. पिल्ले फिकट पिवळया रंगाची असतात. कोष पिवळसर तपकिरी रंगाचा असून, त्यावर डोळयांच्या जागी लाल रंग दिसून येतो.
  • नुकसानीचा प्रकार : प्रौढ फुलकिडे आणि पिल्ले कपाशीच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेश शुष्क होतात. तो भाग प्रथम पांढुरका आणि नंतर तपकिरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळया आकसतात, झाडाची वाढ खुटंते. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने कडक होऊन फाटतात.प्रादुर्भावाचा कालावधी (सक्रियता) : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उग्र रूप धारण करतात.
  • पोषक घटक : उष्ण व कोरड्या हवामानात फुलकिड्यांचे प्रजनन वाढते व जीवनक्रम कमी कालावधीत पूर्ण होतो व जास्त पिढ्या तयार होतात. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाची जास्त कालावधीची उघडीप पडली तर मोठया संख्येत वाढतात.
  • आर्थिक नुकसानीची संकेत पातळी : १० फुलकिडे / पान

मावा

  • ओळख : प्रौढ पिवळसर हिरवी ते गडद हिरवी, मृदु, लहान असतात. त्याच्या मागील बाजूस पाठीवर दोन शिंगासारख्या नलिका असतात. प्रौढ पंखाचे किंवा बिनपंखाचे असतात. पिल्ले लहान, मृदु, हिरवट तपकिरी ते पिवळसर असतात. पिल्लांच्या पाठीवरदेखील दोन शिंगासारख्या नलिका असतात.
  • नुकसानीचा प्रकार : माव्याची प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळया शेंडयावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात.  अशी पाने आकसतात व मुरगळतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. याशिवाय माव्याने शरिरातून बाहेर टाकलेल्या चिकट गोड द्रवामुळे बुरशीची वाढ होऊन पाने काळसर होतात. पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास कापसाची बोंडे चांगली उमलत नाहीत. तसेच काही विषाणूंचा प्रसार माव्यामार्फत केला जातो.
  • प्रादुर्भावाचा कालावधी (सक्रियता) : मावा या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपवस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत आढळतो. कोरडवाहू कपाशीवर सर्वसाधारणपणे जुलैच्या दुस­या आठवडयापासून सुरु होतो. सर्वात जास्त प्रादुर्भाव जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा दुसरा आठवडा आणि पिकाच्या शेवटी डिसेंबर-जानेवारी महिन्यात आढळून येतो.
  • पोषक घटक : रिमझिम पाऊस आणि अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीला पोषक असते. परंतु जोराचा पाऊस झाल्यास त्यांची संख्या कमी होते.
  • आर्थिक नुकसानीची संकेत पातळी : १५ ते २० टक्के प्रादुर्भावग्रसत झाडे किंवा १० मावा / पान

 

पांढरी माशी

  • ओळख : प्रौढ मृदु शरीराचे फिकट पिवळया रंगाचे असतात. पंखावर पांढरे मेणचट आवरण असते. नर हे मादीपेक्षा आकाराने लहान असतात. सुरुवातीला अंडी पांढरी व नंतर  तपकिरी रंगाची होतात. ही अंडी उघडया डोळयांनी दिसत नाही. भिंग किंवा सुक्ष्मदर्शक यंत्राव्दारे पाहता येतात. पहिल्या अवस्थेतील पिल्लांना डोळे, पाय व मिशा असतात. पिल्ले चपटी, अंडाकृती व हिरवट पिवळी असतात. नंतरच्या अवस्थेतील पिल्लांना पाय आणि मिशा नसतात. शेवटच्या अवस्थेतील पिल्लांचे डोळे लाल असतात. शेवटच्या अवस्थेतील पिल्लांना कोष अवस्था देखील म्हणतात.
  • नुकसानीचा प्रकार : पांढ­या माशीची पिल्ले तसेच प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात, अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त असल्याने पाने लालसर ठिसूळ होवून शेवटी वाळतात. याशिवाय पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात. व त्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी पाने व झाड चिकट व काळसर होते आणि झाडाची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते. याशिवाय झाडावरील पाते, फुले आणि लहान लहान बोंडे यांची गळ होऊन कपाशीच्या उत्पादनावर आणि प्रतिवर विपरित परिणाम होतो. काही रोगांच्या विषाणूचा प्रसारसुध्दा या माशीमुळे होतो.
  • प्रादुर्भावाचा कालावधी (सक्रियता) : पांढ­या माशीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून सुरु होतो व नंतर नोव्हेंबर महिन्यात अधिकतम प्रादुर्भाव आढळून येतो.
  • पोषक घटक : कमाल तापमान व सुर्यप्रकाश वाढल्यास, किमान तापमान, पर्जन्य व आर्द्रता कमी झाल्यास पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो. पायरेथ्रॉइड गटातील किटकनाशकाचा अति वापर केल्यामुळे पांढ­या माशीचा कपाशीवर वारंवार पुर्नउद्रेक होत आहे.
  • आर्थिक नुकसानीची संकेत पातळी : ८ ते १० प्रौढ माशा किंवा १० पिल्ले / पान

 

पिठया ढेकूण

  • ओळख : प्रौढ मादी पिवळसर रंगाची, अंडाकृती असून तिच्या शरीरावर मेणाचे पांढरे आवरण असते. मादी पंखहीन असतात. नरांना पंखाची एक जोडी असते. अंडी फिकट पिवळसर असतात. अंडी पुंजक्यामध्ये असून पुंजक्याभोवती कापसासारखे मेणाचे पांढरे आवरण   असते. पिल्ले फिकट पिवळसर असून डोळे लालसर असतात.
  • नुकसानीचा प्रकार : पिठया ढेकणाची पिल्ले व प्रौढ या दोन्ही अवस्था कपाशीची पाने, कोवळी शेंडे, पात्या, फुले व बोंडे यातून रस शोषण करतात. त्यामुळे ते सुरुवातीला सुकतात व नंतर वाळून जातात. हे ढेकूण आपल्या शरिरातून साखरेसारखा गोड द्रव बाहेर टाकतात. कालांतराने त्यावर  काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाड चिकट व काळपट दिसतात. झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन झाडाची वाढ खुंटते व त्यामुळे उत्पादनात घट येते. पिठया ढेकणाने साखरेसारखा गोड पदार्थ सोडल्यामुळे त्यावर मुंगळे आढळतात.
  • पोषक घटक : लांबलेला पाऊस, उष्ण व दमट हवामानात या किडीची जलद वाढ होते. काही नवीन किडनाशकाचा अमर्याद वापर व वारंवार फवारणी केल्यामुळे परोपजीवी मित्र कीटकावर परिणाम होऊन पिठया ढेकणाचे पुनरुत्थान होते.
  • आर्थिक नुकसानीची संकेत पातळी : ५ ते १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे

डॉ. बस्वराज भेदे, डॉ. खिजर बेग, श्री. गणेश सोनुलेकापूस संशोधन केंद्र, नांदेड 

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणपीकपीक व्यवस्थापनखरीपशेतीशेतकरीकापूस