Join us

तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे हे कसे ओळखाल?

By बिभिषण बागल | Published: July 19, 2023 10:30 AM

राज्यामध्ये कोकण वगळता पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते.

भारतामध्ये जवळपास २२८.८ दशलक्ष हेक्टर जमीन चुनखडीयुक्त असून हे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ६९.४ टक्के आहे. राज्यामध्ये चुनखडीयुक्त जमिनींची समस्या अनेक शेतकऱ्यांना जाणवते. अशा जमिनीच्या व्यवस्थापनासंदर्भात आधी जाणून घेऊ.

  • अशा जमिनींचा सामू आठपेक्षा जास्त असतो. जमिनीची विद्युत वाहकता एक डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते. नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते, पिकांची वाढ खुंटते. अशा जमिनी या फळबाग लागवडीस योग्य नसतात; मात्र अशा प्रकारच्या जमिनीतून भुईमूग आणि बटाटा पिकांचे उत्पादन चांगले येते.
  • राज्यामध्ये कोकण वगळता पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये चुनखडीयुक्त जमिनी आढळतात. विशेषतः अवर्षणप्रवण क्षेत्र, जास्त उष्णता, कोरडे हवामान, कमी पाऊस, तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेल्या विम्लधर्मीय जमिनीतील मातीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण कमी- अधिक प्रमाणात विखुरलेले दिसून येते.

जमिनीत मुक्त चुन्याचे दोन प्रकार आढळून येतात.

१) चुनखडी खडे २) चुनखडी पावडर

  • चुनखडी पावडर हि चुनखडी खड्यापेक्षा जास्त क्रियाशील असल्यामुळे जास्त दाहत असते. बऱ्याचवेळा चुन्याचे प्रमाण खालच्या थरात वाढत जाऊन तेथे अत्यंत कठीन चुन्याचा पातळ थर तयार होतो, अशा थरामुळे पाण्याच्या निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते.
  • पाण्यामध्ये जर विद्राव्य चुन्याचे प्रमाण जास्त असेल आणि ओलितासाठी या पाण्याचा उपयोग केला तर जमिनी चुनखडीयुक्त होता .
  • जमिनीमध्ये चुन्याचे प्रमाण जर ३ ते ४ टक्क्यांपर्यंत असेल तर अशा जमिनी उत्पादनक्षम असतात आणि या जमिनीमध्ये अन्नद्रव्याच्या उपलब्धतेचे प्रश्न निर्माण होत नाहीत.
  • जमिनीतील चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा जास्त झाल्यानंतर अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते
  • चुनखडीचे थर जमिनीतील एक मीटरच्या आत दिसून आल्यास फळबाग लागवडीसाठी जमीन योग्य नसते. अशा जमिनीत फळबागेचे आयुष्य कमी राहते. उत्पादकता कमी होते. म्हणून फळबागेच्या  लागवडीसाठी खड्डे करताना मातीच्या थरांकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे. असे चुनखडीचे थर १५ सेंमी पेक्षा जास्त रुंदीचे व एक मीटरच्या आत साठलेले नसावेत. अशा जमिनीत फळबाग लागवड यशस्वी होत नाही.

असे केली जाते जमिनीतील मुक्त चुन्याची वर्गवारी

मुक्त चुन्याचे प्रमाण

वर्गवारी

< १ %

अतिशय कमी

१-५ %

कमी

५-१० %

मध्यम

१०-१५ %

जास्त

> १५ %

अपायकारक (अतिशय जास्त)

चुनखडी युक्त जमिनीचे गुणधर्म व अन्नद्रव्यांशी संबंध

  • चुनखडीयुक्त जमिनीचा सामू अल्क्धार्मी असतो व यामध्ये विद्राव्य स्वरूपातील कार्बोनेट व बायकार्बोनेटचे प्रमाण जास्त असते यामुळे सामू सर्वसाधारण ७.५ ते ८.५ च्या वरती शक्यतो जात नाही.
  • जमिनीचा रंग भुरकट पांढरा दिसून येतो.
  • जमिनीची घनता वाढते. म्हणजेच जमिनीची घडण कडक बनते. त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते.
  • पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते.
  • जमिनीतील मातीचा सामू विम्लधर्मीय (सामू ८.० पेक्षा जास्त), तर क्षारांचे प्रमाण कमी असते.
  • मातीत मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्केपेक्षा जास्त असते. हेच प्रमाण १५ टक्केपेक्षा जास्त असल्यास पिकांना, फळपिकांना हानिकारक ठरते.
  • उपलब्ध मुख्य अन्नद्रव्यांची (नत्र, स्फुरद, पालाश) उपलब्धता कमी होते.
  • उपलब्ध दुय्यम अन्नद्रव्यांची (मॅग्नेशिअम, गंधक) उपलब्धता कमी होते.
  • उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांची (लोह, जस्त, बोरॉन) उपलब्धता कमी होते.
  • लोहाच्या कमतरतेमुळे पिकांची पाने पिवळी पडून शिरा हिरव्या राहतात. हीच पाने पुढे पिवळी पडतात व नंतर वाळतात. पिकांची वाढ खुंटते. यालाच इंग्रजीमध्ये ‘लाइम इन्ड्यूस क्‍लोरोसिस’ असे म्हणतात. शेतकरी याला ‘केवडा पडला’ असे म्हणतात. कोरडवाहू क्षेत्रात गावातील गावठाण जागेत अशा पांढऱ्या चुनखडीयुक्त जमिनी आढळून येतात.
  • चुनखडीयुक्त जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने वाळवी, हुमणी, सूत्रकृमींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.

- शुभम दुरगुडे(आचार्य पदवीचे विद्यार्थी मृदविज्ञान जि बी पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर)- डॉ. अनिल दुरगुडे(मृदविज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)९४२०००७७३२ / sdurgude0038@gmail.com

टॅग्स :शेतीखतेपीक