पुणे : महाराष्ट्र राज्य हे शेती क्षेत्रात जेवढं पुढारलेलं आहे तेवढंच शेतीच्या विविधतेने नटलेलं सुद्धा आहे. या एकाच राज्यामध्ये खूप प्रकारच्या शेतीपद्धती पाहायला मिळतात. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ हे चार मुख्य विभाग असले तरीही या चारही भागातील पीक पद्धतीमध्ये वेगळेपण जाणवते. पण मागच्या काही दशकांमध्ये राज्यातील पीक पद्धतीमध्ये मोठा बदल झाला आहे.
राज्यातील पीक पद्धतीचा विचार केला तर कोकणात आणि घाट परिसरात भात हे प्रमुख पिक घेतले जायचे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात भाजीपाला पिके, फळपिके, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर, कापूस ही पीके प्रामुख्याने घेतली जात होती. पण हरीत क्रांती, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, हमीभावाची नसलेली शाश्वती, सरकारचे धोरणे आणि सध्याची मजुरांची टंचाई यामुळे पीक पद्धतीमध्ये मोठा बदल झाला आहे.
मागच्या सहा दशकाचा म्हणजे १९६० पासून २०२४ सालापर्यंतच्या शेतीपद्धतीचा विचार केला तर राज्यात प्रमुख पीक हे ज्वारीचे होते. १९६० च्या दशकामध्ये राज्यातील खरीप ज्वारीचे क्षेत्र हे २५ लाख ५० हजार हेक्टर तर रब्बी ज्वारीचे क्षेत्र हे ३७ लाख ३६ हजार हेक्टर एवढे होते. त्यापाठोपाठ कापूस, बाजरी, आणि भात हे प्रमुख पीक होते. त्यानंतर डाळवर्गीय तूर आणि हरभरा या पिकांचा सामावेश होत होता.
पण १९६० च्या दशकात असलेल्या पीक पद्धतीमध्ये सध्या मोठा बदल झाला आहे. सध्या राज्यातील प्रमुख पीक हे सोयाबीन असून त्यापाठोपाठ कापूस आणि मक्याचा नंबर लागतो. यंदाचे सोयाबीचे क्षेत्र विचारात घेतले तर जवळपास ५० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी अपेक्षित आहे आणि ४० लाख हेक्टरवर कापसाची लागवड अपेक्षित आहे.
तेलबिया पिकांचा विचार केला तर १९६० च्या दशकामध्ये केवळ खरीप तीळाचे उत्पादन घेतले जात होते. सुर्यफूल आणि सोयाबीनच्या पिकांचे उत्पादन घेतले जात नव्हते. पण १९८०-८१ साली सुर्यफूल आणि १९८४-८५ साली सोयाबीनचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आणि या पिकांच्या लागवडीकडे शेतकरी हळूहळू वळू लागले. पण त्यातील सोयाबीन पिकाने भरारी घेत सध्या राज्यातील प्रमुख पिक म्हणून मान मिळवला आहे.
मका, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ऊस आणि काही प्रमाणात गहू या पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली असून ज्वारी, बाजरी, नाचणी, सूर्यफूल, कारळे, तीळ या पिकांच्या क्षेत्रामध्ये कमालीची घट पाहायला मिळते. हरीत क्रांतीनंतर शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे वाढू लागला असून पारंपारिक आणि पौष्टिक अन्नधान्य पिकांकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचं यावरून दिसून येते.
काय आहेत कारणे?
राज्यातील पीक पद्धतीमधील बदलाला कारणीभूत एकमेव कारण म्हणजे शेतमालाला हमीभावाचे नसलेले संरक्षण आणि करमुक्त आयातीमुळे भारतीय शेतमालाच्या दराला बसलेला फटका. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देत नगदी पिकांकडे वळाले.
दुष्काळी भागातही शेतकरी जास्त पाणी लागणारी म्हणजे उस, कापूस, सोयाबीन, मका यांसारखी पीके घेऊ लागली. परिणामी ज्या भागात पावसाचे प्रमाण ५०० मिमी एवढे असले तरीही त्या भागातील शेतकरी ६०० ते ७०० मिमी पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड करू लागले. यामुळे पाण्याची टंचाई भासून भूजलाचा बेसुमार उपसा सुरू झाला आहे. राज्यातील या बदलत्या पीकपद्धतीमुळे शेतीवर पाणीटंचाईसारखे संकटे ओढावताना दिसत आहेत.
पिकाच्या क्षेत्रामध्ये झालेला बदल (क्षेत्र '०००' हेक्टरमध्ये)
पीके | १९६०-६१ | १९७०-७१ | १९८०-८१ | १९९०-९१ | २०००-०१ | २०१०-११ | २०२०-२१ | २०२१-२२ | २०२२-२३ | वाढले/कमी झाले |
खरीप तांदूळ | १३०० | १३५२ | १४५९ | १५९७ | १४८६ | १४८६ | १४७३ | १४७३ | १५२३ | किरकोळ वाढले |
खरीप ज्वारी | २५४९ | २५३७ | २९७१ | २७६८ | १९१० | १०३२ | ३७९ | ३३९ | १५१ | कमी झाले |
बाजरी | १६३५ | २०३९ | १५३४ | १९४० | १८०० | १०३५ | ६८७ | ६४५ | ४९१ | कमी झाले |
नाचणी | २३० | १९० | २१४ | २०३ | १५५ | १२० | ८१ | ८१ | ८८ | कमी झाले |
सूर्यफूल | ० | ० | २६ | १९९ | १३७ | ६९ | १९ | ११ | १२ | कमी झाले |
कारळे | ८३ | ८३ | ८३ | ९२ | ६१ | ३५ | ८ | ६ | ६ | कमी झाले |
तीळ | १२८ | ७१ | ८६ | २३२ | १३२ | ५३ | १९ | १७ | ६ | कमी झाले |
कापूस | २५०० | २७५० | २५५० | २७२१ | ३०७७ | ३९४२ | ४५४५ | ४४१० | ४२४० | वाढले |
सोयाबीन | ० | ० | ० | २०१ | ११४२ | २७२९ | ४२९० | ४५२६ | ४८९३ | वाढले |
तूर | ५३० | ६२७ | ६४४ | १००४ | १०९६ | १३०२ | १३४० | १४१९ | ११९१ | वाढले |
हरभरा | ४०२ | ३१० | ४१० | ६६८ | ६७६ | १४३८ | २२३१ | २३७२ | २९३५ | वाढले |
गहू | ९०७ | ८१२ | ११३७ | ८६७ | ७५४ | १३०७ | ११२६ | ११३२ | १२०४ | वाढले |
ऊस | १५६ | १६७ | २५८ | ४४२ | ५९५ | ९६५ | ११४३ | १४८९ | १४८८ | वाढले |