राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सध्या पिवळा मोझॅक या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठा फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. आधी पावसाचा खंड व खंडानंतर जास्तीचा झालेला पाऊस अशा हवामान बदलांमुळे झालेल्या पिवळा मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल मंत्रिमंडळ बैठकीतही सोयाबीन पीकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक तसेच खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पीकाची लागवड केली जाते. राज्यात १ लाख ४३ हजार १९६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनला यंदा पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. यामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव नांदेड जिल्ह्यात एकूण ५८ हजार ९२२ हेक्टर क्षेत्रात झाला असून चारकोल रॉट आणि मुळकुज या बुरशीजन्य रोगाची लागण ४२ हजार ५५६ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम या जिल्ह्यांमध्येही मोठ्या क्षेत्रावर पिवळा मोझॅक व इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
राज्यात एकूण सोयाबीन पीकाचे क्षेत्र ५० लाख ६४ हजार ५४१ हेक्टर एवढे असून १ लाख ४३ हजार १९६ हेक्टर क्षेत्रावरील पिकावर पिवळा मोझॅक रोग पडला आहे. हवामान बदल, पिकांची फेरपालट नसणे, पावसाचा खंड, खंडानंतर जास्तीचा पाऊस अशा कारणांमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोयाबीन पिकासाठी पंतप्रधान फसल बीमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र ११ कोटी ३३ लाख ३०८ हेक्टर क्षेत्र संरक्षित आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये पीक विमा असल्याने विम्याची मदत लवकर वेळेत मिळण्याची शेतकऱ्यांना गरज आहे.
जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती क्षेत्रावर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव?
जिल्हा | पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव हेक्टर | पीक विमा संरक्षित क्षेत्र हेक्टर |
नांदेड | ५८,९२२ | ६,२५,३९५.९४ |
नागपूर | १५,२४२ | ८०,३१८.४२ |
सोलापूर | १३,७५० | १,५९,१७१.२९ |
लातूर | ७,४२० | ५,२३,२४८.३३ |
जालना | ७,३७४ | २,९२,४३० |
अहमदनगर | ७,०१४ | २,३१,०३५.१५ |
अमरावती | ६,९३४ | २,४५,८५२.६४ |
धाराशिव | ६,५२६ | ५,२३,२४८.३३ |
वाशिम | ६,४२१ | २,८३,०३० |