Cotton Soybean Subsidy Latest Updates : राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५ हजार रूपयांचे अनुदान ३० सप्टेंबर रोजी वाटप केले आहे. राज्यातील एकूण ९६ लाख खातेदारांना दोन हेक्टरच्या मर्यादेत या अनुदानाचे वाटप केले जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील ४९ लाख ५१ हजार खातेदारांना या अनुदानाचा लाभ मिळाला होता.
दरम्यान, कापूस आणि अनुदानासाठी पात्र असलेल्या राज्यातील एकूण खातेदारांची संख्या ही ९६ लाख एवढी आहे. त्यातील ८० लाख वैयक्तिक तर १६ लाख संयुक्त खाते आहेत. ८० लाख वैयक्तिक खात्यांपैकी ६४ लाख खातेदारांचे आधार संमतीपत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. तर संयुक्त खातेदार आणि १३ लाख वैयक्तिक खातेदारांचे संमतीपत्र अजून आलेले नाहीत.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात एकूण २ हजार ३९८ कोटी रूपयांचे वाटप ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना करण्यात आले होते. तर त्यानंतरच्या १० दिवसांत म्हणजे १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातील एकूण २ हजार ५६४ कोटी रूपयांचे वाटप झाले आहे.
सोयाबीन उत्पादन करणारे ४५ लाख २५ हजार खातेदार म्हणजेच ३३ लाख ३९ हजार शेतकरी आणि कापूस उत्पादित करणारे २२ लाख ३७ हजार खातेदार म्हणजेच १९ लाख २६ हजार शेतकऱ्यांना असे एकूण ६७ लाख ६१ हजार खातेदार आणि ५७ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना आत्तापर्यंत २ हजार ५६४ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे.
काय आहेत अडचणी?
पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान खात्यावर जमा झाले नाही. तर अनेक संयुक्त खातेदारांच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. वैयक्तिक आणि संयुक्त खातेदारांनी आपापले आधार संमतीपत्र कृषी सहाय्यकाकडे दिल्यानंतरच अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. तर संयुक्त खातेदारांसाठी सामायिक क्षेत्रामध्ये नावे असणाऱ्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या असणे गरजेचे आहे. तर एकाच व्यक्तीच्या नावे पैसे जमा केले जाणार आहेत. पण कुणाच्या नावावर किती क्षेत्र आहे त्यानुसार संयुक्त खातेदारांनी एकमेकांत ठरवून वाटप करायचे आहेत.
अनेक सामायिक खातेदार नोकरी, धंद्यानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे संमतीपत्र देण्यास अडचणी येत आहेत. पण ज्या संयुक्त खातेदारांनी स्वाक्षऱ्या करून संमतीपत्र दिले आहे त्यांच्यातील नॉमिनेट केलेल्या खात्यावर अनुदानाचे पैसे वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे संयुक्त खातेदारांनी लवकरात लवकर आपले संमतीपत्र देण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत एकूण
- खातेदार - ६७ लाख ६१ हजार
- शेतकरी - ५७ लाख ६५ हजार
- रूपये वाटप - २ हजार ५६४ कोटी रूपये