सूरज पाटील :यवतमाळ : कोरडवाहू शेतीक्षेत्र सिंचनाखाली यावे, यासाठी कोल्हापूरमध्ये यशस्वी झालेला बंधाऱ्याचा पॅटर्न राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात राबविण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करून २८२ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले.
त्यातून हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, अशी अपेक्षा होती. देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने किती हेक्टर शेती सिंचनाखाली आली, याचे उत्तर जिल्हा परिषदेच्या मृत व जलसंधारण विभागाकडे नाही.
नदी, नाला पात्रामध्ये हंगामातील शेवटचा पाऊस, तसेच दीर्घकाळ टिकणारा प्रवाह बंधाऱ्यात लाकडी फळ्या अथवा लोखंडी गेट टाकून अडवला जातो.
या बांधकामाचा प्रयोग सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी झाल्याने यास कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असे नामकरण झाले, जलसंधारण व त्याद्वारे पिकांना थेट संरक्षित पाण्याची सोय करणे, परिसरातील जलस्रोतांचे पुनर्भरण करून भूगर्भजल पातळी वाढण्यास मदत करणे, हा प्रमुख उद्देश यामागे होता.नाल्याची खोली कमीत कमी १.५ मीटरपर्यंत असावी, नाल्याच्या उतार, नाल्याचे दोन्ही काठ मजबूत असावेत, बंधाऱ्याच्या आसपास विहिरींची संख्या जास्त असावी, याप्रमाणे जागांची निवड करण्यात आली.
त्यानुसार कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जिल्ह्यात २८२ बंधारे बांधण्यात आले, यावर लावण्यात आलेल्या लोखंडी बरग्याकडे चोरट्यांची वक्रदृष्टी गेली. चोरट्यांनी बंधाऱ्यावर लावण्यात आलेले बरगे चोरी करून भंगारात विक्री केले. त्यावर पुन्हा बरगे बसविण्याकडे प्रशासनाने डोळेझाक केली. बहुतांश बंधारे जुने झाल्याने त्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक होते. मात्र, त्यासाठी गांभीर्याने पाठपुरावा करण्यात आला नाही.
मनुष्यबळाचा तुटवडा
शेतीक्षेत्र सिंचनाखाली यावे, या उद्देशाने कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, जिल्हा परिषदेच्या मृत व जलसंधारण विभागात मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने सध्या किती हेक्टरवर सिंचन होते, याची माहिती काढण्यात आली नाही, असे उत्तर या विभागातून देण्यात आले.
सिमेंट नाला बंधाऱ्यावर 'फोकस'● कोल्हापुरी बंधायाचे पुन्हा नव्याने बांधकाम करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत नाही. त्यासाठी तांत्रिक अडचणी पुढे करण्यात येत आहे.● बरग्यांची चोरी केली जाते. दुरुस्तीसाठी निधी दिला जात नाही. यामुळे आता विनागेटचे सिमेंट नाला बंधाराच्या कामावर फोकस करण्यात आला आहे.● कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बंधायातून किती हेक्टर क्षेत्रावर सिंचन होते, याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही.
निर्लेखनाचे प्रस्ताव पाच
कोल्हापुरी बंधारे जुने झाले आहेत. त्याची नव्याने दुरुस्ती करणे शक्य नाही. पावसाळ्यात बंधाऱ्याचे पाणी शेतशिवारात शिरून पिकांचे नुकसान होते. जिल्ह्यात पाच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या निर्लेखनाचे प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत.
कोणत्या तालुक्यात किती?
यवतमाळ | ५३ |
कळंब | २८ |
राळेगाव | ३३ |
घाटंजी | ०९ |
दारव्हा | १७ |
बाभूळगाव | ३१ |
अर्णी | ०३ |
नेर | २६ |
पुसद | ११ |
महागाव | १० |
उमरखेड | ०३ |
दिग्रस | ०६ |
वणी | ०६ |
मारेगाव | २३ |
पांढरकवडा | १६ |
झरी जामणी | ०७ |