पुणे : खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू असून शेतकऱ्यांनी शेताची मशागत सुरू केली आहे. तर हवामान विभागानेही यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरी जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, यंदा खरिपासाठी बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस आणि भात हे मुख्य पीके असून मका, बाजरी, मूग, उडीद, खरीप ज्वारी आणि इतर कडधान्यांची लागवड केली जाते. तर खासगी कंपन्यांकडून आणि सरकारी संस्थांकडून बियाण्यांचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर अनेक शेतकरी घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरतात.
किती बियाणे उपलब्ध?
दाच्या हंगामात राज्यातील एकूण अपेक्षित पेरणी क्षेत्र हे १४७.७७ लाख हेक्टर असून बियाणे बदल दरानुसार बियाण्यांची गरज ही १९.२८ लाख क्विंटल एवढी आहे. त्यामध्ये महाबीजकडून ३.७६ लाख क्विंटल, राष्ट्रीय बीज निगमकडून ०.५९ लाख क्विंटल आणि खासगी बियाणे संस्थांकडून २०.६५ लाख क्विंटल अशा एकूण २५.०६ लाख क्विंटल अपेक्षित बियाण्यांची उपलब्धता आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख पिक असून अपेक्षित पेरणी क्षेत्र ५०.७० लाख हेक्टर एवढे आहे. या क्षेत्राकरिता १३.३१ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून १८.४६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यानंतर कापूस पिकाचे ४० लाख हेक्टर क्षेत्र असून याकरिता ०.९५ लाख क्विंटल बियाणे गरज आहे व ०.९७ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
भात पिकाचे १५.९१ लाख हेक्टर क्षेत्र असून याकरिता २.२९ लाख क्विंटल बियाणे गरज आहे, व २.५५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. मका पिकाचे ९.८० लाख हेक्टर क्षेत्र असून, याकरिता १.४७ लाख क्विंटल बियाणे गरज आहे, व १.६० लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तुर, मुग, उडीद या कडधान्य पिकांचे एकुण क्षेत्र १९.०० लाख हेक्टर क्षेत्र असून याकरिता ०.८२ लाख क्विंटल बियाणे गरज आहे व ०.९१ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
तसेच इतर पिकाखालील एकुण १२.३६ लाख हेक्टर क्षेत्र असून याकरिता ०.४४ लाख क्विंटल बियाणांची गरज आहे व ०.५२ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. पेरणीक्षेत्रानुसार राज्यात सद्यस्थितीत गरजेपेक्षा जास्त बियाणे उपलब्ध असून बियाण्यांची टंचाई नाही.