Join us

कडक उन्हाळ्यात राज्यात जनावरांसाठी किती चारा उपलब्ध?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 9:54 PM

पाण्याची कमतरता असल्यामुळे चारा पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पुणे : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण यंदा पाणीचंटाई आणि चाराटंचाईचा सामाना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. पाण्याची कमतरता असल्यामुळे चारा पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्याचा विचार केला तर पशुसंवर्धन विभागाकडून चारा पिकांच्या लागवडीसाठी नियोजन करण्यात आले असून फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत एकूण ३ हजार ९८८.४३ लाखांचा निधी खर्च करून १२ हजार ६३६.०६ क्विंटल वैरण बियाण्याचे वितरण करण्यात आलेले आहे. यामुळे राज्यातील ४२ हजार १२०.२० हेक्टर क्षेत्रात वैरण पिकांची पेरणी होवून, २०.९३ लक्ष मेट्रीत  टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून मिळाली आहे.

कृषी विभागाच्या रब्बी हंगामाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार (१३ फेब्रुवारी २०२४ अखेर) राज्यात रब्बी ज्वारी १६ लाख १७ हजार ९९२ हेक्टर (सरासरीच्या ९२ टक्के), मका ३ लाख ४० हजार ८१० (सरासरीच्या १३२ टक्के), इतर रब्बी तृणधान्य १० हजार ४०७ हेक्टर (सरासरीच्या ९२ टक्के), अशी एकूण ३० लाख ०९ हजार ५२४ हेक्टर (सरासरीच्या ९८ टक्के) पिकांची पेरणी झालेली आहे.

कृषी विभागाच्या दिनांक १५ एप्रिल अखेरच्या साप्ताहिक पेरणी अहवालानुसार उन्हाळी हंगामात राज्यात उन्हाळी मका ४७ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रात (सरासरीच्या ८२ टक्के), उन्हाळी ज्वारी २९ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रामध्ये (सरासरीच्या २३५ टक्के) आणि उन्हाळी बाजरी ३२ हजार ३५० (सरासरीच्या १५० टक्के) अशी पिकांची पेरणी झालेली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या दैनंदिन बाजार भावानुसार जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत कडब्याचे सरासरी दर १२४० रूपये प्रति क्विंटल होते. तर मार्च २०२४ मध्ये यामध्ये ५० टक्क्यापेक्षा अधिक घट होवून, सदर दर ५११ रूपये प्रति क्विंटल असे असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीप्राण्यांवरील अत्याचार