केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी २३ लाख ५० हजार टन साखरेचा कोटा खुल्या बाजारात विक्रीसाठी जाहीर केला आहे. हा कोटा एप्रिल २०२४ मध्ये जाहीर केलेल्या कोट्यापेक्षा दीड लाख टनांनी कमी आहे.
याचबरोबर मार्च साठी जाहीर केलेल्या कोट्यातील शिल्लक साखर विक्रीसाठी दि. १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून मागणी-पुरवठ्याचा अंदाज घेऊन खुल्या बाजारात किती साखर विक्री करण्याला परवानगी साखर कारखान्यांना द्यावयाची याचा कोटा दर महिन्याला ठरवून दिला जातो.
मार्च महिन्यासाठी २३ लाख टन साखरेचा कोटा जाहीर करण्यात आला होता. उन्हाळ्यामुळे शीतपेयांच्या तसेच लग्नसराईमुळे मेवा मिठाई आणि गोड खाद्यपदार्थाच्या मागणीत वाढ होते. गेल्या एप्रिलमध्ये २५ लाख ८० हजार टन साखरेची विक्री झाली होती.
चालू म्हणजेच मार्च महिन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कोट्यातील एक लाख टन साखर एप्रिलमध्ये विक्रीसाठी शिल्लक राहील असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. ती साखर विक्रीसाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
साखर साठेबाजांवर कठोर कारवाई
मासिक साठवण मर्यादा आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. साठेबाजीला आळा घालण्यासाठी आणि किमर्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेसाठी मासिक साठवण मर्यादा निश्चित केली आहे.
अधिक वाचा: राज्यातील या १५ साखर कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाईचे आदेश; साखर विकून पैसे देणार?