विश्वास पाटील
कोल्हापूर : राज्य शासन व महाराष्ट्रातील तमाम सहकारी आणि खासगी कारखान्यांच्या शेती विभागाचा अंदाज चुकवून यंदाचा ऊस गाळप हंगाम बुधवारी समाप्त झाला. राज्यात यंदाच्या हंगामात १०७३ लाख टन गाळप झाले असून, ११० लाख टन साखर उत्पादन झाले.
सरासरी साखर उतारा १०.२७ टक्के राहिला. यंदाच्या हंगामात २०७ कारखान्यांनी गाळप केले. उत्तर प्रदेशात एप्रिलअखेर १०५९ लाख टन गाळप झाले असून, १०३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. त्यांचा हंगाम मे अखेरपर्यंत चालणार असून, संभाव्य गाळप विचारात घेतले तरी महाराष्ट्राने साखर उत्पादनात भरारी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
गतवर्षीच्या हंगामात सलग पाऊस झाला नाही. त्यामुळे उसाची वाढ नीट झाली नाही. अनेक भागात पाऊस कमी झाल्याने त्याचा फटका ऊस उत्पादनाला बसला असून, त्यामुळे किमान १५ टक्के गाळप कमी होईल असा अंदाज सरकारी यंत्रणांनी व कारखानदारांनीही व्यक्त केला होता.
अधिकृत यंत्रणांनी ८५५ लाख टन गाळप आणि ९० लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज गृहीत धरला होता. परंतु, तो पुरता चुकीचा ठरला. थांबून थांबून झालेला ऊन-पाऊस हा उसाला पोषक ठरला. जास्त पूर न आल्याने नदीकाठच्या उसाला धोका पोहोचला नाही.
परतीचा पाऊस सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील ऊस पिकांना पोषक ठरला. त्यामुळे सरासरी प्रतिहेक्टरी ऊस उत्पादन वाढलेच शिवाय उताराही वाढल्याचे हंगामानंतर स्पष्ट झाले. त्यामुळेच सरासरी १३० दिवस हंगाम सुरळीत चालला. हंगाम जास्त दिवस चालला तर त्यातून कारखान्याचे अर्थकारण सदृढ होते. त्याचा लाभ यंदाच्या हंगामात झाला.
एफआरपी वाढली, खरेदी किंमत जैसे थे
यंदाच्या हंगामातील सुमारे ७५० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना देय आहे. केंद्र सरकारने २०१९ ला जेव्हा एफआरपी २७५० रुपये होती तेव्हा साखरेचा खरेदी दर ३१०० रुपये निश्चित करून दिला. तो वाढवावा म्हणून गेली पाच वर्षे साखर उद्योग टाहो फोडत असताना केंद्र सरकार त्यात वाढ करायला तयार नाही. आता येत्या हंगामात एफआरपी ३४०० रुपये असेल आणि साखरेचा दर मात्र ३१०० वर अडकला आहे. यंदाच्या हंगामातही बाजारातील साखरेचा सरासरी दर ३४०० ते ३६०० क्विंटल असाच राहिला.
अंदाज चुकल्याचा परिणाम
साखर हंगाम कमी दिवस चालणार अशी चर्चा हंगामाच्या सुरुवातीलाच सुरू झाल्यावर त्यानुसारच केंद्र सरकारकडून नियोजन सुरू झाले. साखरेचे दर वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने इथेनॉल करण्यास बंदी घातली. हंगाम संपल्यावर इथेनॉलसाठी बी हेवी मोलॅसिस वापरण्यास परवानगी दिली. परंतु त्याचा फटका कारखान्यांना बसला. त्यामुळे गाळपाचा चुकीचा अंदाज साखर उद्योगावर किती परिणाम करू शकतो हेच त्यातून स्पष्ट झाले.
गाळप हंगाम समाप्त : १५ मे २०२४
हंगामाचे सरासरी दिवस : १३०
सन | राज्याचा हंगाम (लाख टन) | एकूण साखर उत्पादन (लाख टन) | सरासरी साखर उतारा (टक्के | गाळप घेतलेले व बंद झालेले कारखाने |
२२-२३ | १०५५ | १०५ | ९.९८ | २११ |
२३-२४ | १०७३ | ११० | १०.२७ | २०७ |