Join us

रब्बी हंगामासाठी पुण्याला किती पाणी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:00 AM

पुण्याच्या पाण्याबाबत आज बैठक

यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाने धरणसाठ्यातील पाण्याची आवक मागील वर्षाच्या तुलनेत जेमतेमच राहिली. परिणामी पुण्यातील धरणामधून शहरासाठी तसेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पिकांसाठी किती पाणी दिले जाणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे.  पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. २०) कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे. त्यात पुण्याच्या पाण्याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील धरणे पूर्णपणे भरली नाहीत. जिल्ह्यात पावसाची स्थितीही जेमतेमच राहिली. त्यामुळे ग्रामीण भागाला शेतीच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना शहरासाठीही १२.८६ टीएमसीऐवजी २१ टीएमसी पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे.

मान्सूनने जूनच्या अखेरीस हजेरी लावली. तसेच जुलैतही समाधानकारक पाऊस झाला नाही. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात सर्वत्र ही परिस्थिती होती. परिणामी खरीप हंगामातील पेरण्यांसाठी खडकवासला धरणातून पाणी सोडावे लागले होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांमध्ये यंदा १०० टक्के पाणीसाठा जमा झाला. मात्र, टेमघर यंदाच्या वर्षी पूर्णपणे भरले नाही. खडकवासला प्रकल्पात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच जमा झाला. आजमितीला खडकवासला साखळी प्रकल्पांमध्ये २७.५६ टीएमसी अर्थात ९४.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी याच दिवशी २९.०८ टीएमसी अर्थात ९९.७७ टक्के पाणी उपलब्ध होते.

आज निर्णय होण्याची शक्यता.....

यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलसंपदा विभाग आता रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी देण्याचे नियोजन करीत आहे. तर महापालिकेनेही १२.८६ टीएमसीऐवजी २१ टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे केली आहे. आज त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :धरणपाणीपुणेशेतकरीअजित पवाररब्बी