आंबा व काजू पिकासाठी कणकवली तालुक्यातील सर्व महसूल मंडळांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. महसूल मंडळ स्तरावर असलेल्या शासकीय हवामान केंद्रावरील आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते. या योजनेंतर्गत पाच न वर्षे झालेल्या आंबा व काजू पिकास रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत पुढील नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस विमा संरक्षण मिळते.
अवेळी पाऊस, कमी, जास्त तापमान, वेगाचा वारा या हवामान धोक्यामुळे न आंबा पिकासाठी रु.१,४०,०००/- आणि , काजू पिकासाठी रु.१,००,०००/- विमा संरक्षित रक्कम रुपये प्रती हेक्टर असून शेतकरी विमा हप्ता आंबा पिकासाठी रु.७,०००/- आणि काजू पिकासाठी रु.५०००/- प्रतिहेक्टर आहे.
शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग या योजनेत तालुक्यात आंबा व काजू फळपिकासाठी कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांच्यासहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. मात्र भाडेकरार नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात किंवा कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन आधार कार्ड, ७/१२, खाते उतारा व फळपीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बैंक पासबुक प्रत इ. कागदपत्रांच्या आधारे ऑनलाइन अर्ज भरता येईल.
एक शेतकरी ४ हेक्टर क्षेत्र मर्यादपर्यंत विमा नोंदणी करू शकतो. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मयदित असतो. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात येतो. या विमा योजनेंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या फळपिकासाठी सहभागी झालेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबधित विमा कंपनीकडून देण्यात येत असते.
नुकसानीची विमा कंपनीला सूचना देणे आवश्यक
वेगाचा वारा आणि गारपीट यामुळे नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला सूचना देणे आवश्यक आहे व त्यानंतर वैयक्तिक पंचनामा केला जातो. अधिक माहितीसाठी आपले कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, तसेच बागायतदारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत फळपीक विमा घ्यावा, असे आवाहन कणकवली तालुका कृषि अधिकारी वैशाली मुळे यांनी केले आहे.