छत्रपती संभाजीनगर : अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनाचे क्षेत्र वाढवून आपला आर्थिकस्तर उंचाविता यावा, या हेतूने सिंचन विहिरींसाठी ४ लाखांचे अनुदान, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
मात्र यासाठी काही अटी होत्या त्यातील सिंचन विहिरीसाठी दिडशे फुटांच्या अंतराची अट रद्द करण्यात आली, तर स्वावलंबन योजनेत ही अट कायम आहे. परिणामी, अनुदान व अंतराची मर्यादा वाढवून मिळेल, या अपेक्षेने स्वावलंबन योजनेकडे लाभार्थ्यांनी पाठ फिरवली आहे.
अनुसूचित जाती, जमाती घटकातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, तर जि.प. कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून विहिरीसाठी अनुदान दिले जाते. दोन वर्षांपूर्वी सिंचन विहिरींच्या अनुदानात वाढ करून ते आता ४ लाख करण्यात आले आहे.
तर कृषी स्वावलंब व कृषी क्रांती योजनेत अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळते. हा निधी तुटपुंजा असून, त्यातून विहिरीचे काम पूर्ण होत नाही. दुसरीकडे दोन विहिरींमधील १५० फुटांच्या परिघात विहीर घेता येणार नाही, ही अट देखील डोकेदुखी ठरत असल्यामुळे कृषी स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेला लाभार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
टरबूजची परदेश वारी; आर्थिक कमाल घडली भारी
चालू आर्थिक वर्षात ५० विहिरी पूर्ण
सन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षात १२०० जणांनी अर्ज केले होते. यापैकी ३३१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत ५० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. यंदाही १५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातील सव्वा कोटी स्वर्च झाले आहेत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत १०० लाभार्थ्यांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी २८ जणांची निवड झाली असून २ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. यंदा ७० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
गेल्या वर्षात २३० विहिरी पूर्ण
कृषी स्वावलंबन योजनेअंतर्ग सन २०२२-२३ मध्ये १३५५ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६२५ लाभार्थ्यांची करण्यात आली. त्यातील ५२३ लाभार्थ्यांनी कामे सुरू केली. आतापर्यंत २३० विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी १५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यातील १३ कोटी खर्च झाले आहेत. दुसरीकडे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत २०८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी ७४ लाभार्थ्यांची निवड झाली. १९ लाभार्थ्यांनी कामे पूर्ण केली आहेत.