गेले काही दिवस पाऊस गायब आहे. त्यामुळे भाताची खाचरे वाळली आहेत. नदीकाठच्या खाचरात पाणी असले तरी त्याचा निचरा होत नसल्याने पाणी तापत आहे. निचरा होत नसलेल्या क्षेत्रात 'तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. निचरा योग्य न होणे, घट्ट लागवड, नत्र खतांच्या मात्रा वाजवीपेक्षा जास्त असल्यास तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव अधिक होतो. तुडतुडे व त्याची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतात. परिणामी भाताची पाने पिवळी पडतात व नंतर वाळतात. विशेषतः शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले गोलाकार भाताचे पीक दिसते. याला 'हॉपर बर्न' असे म्हणतात. अशा रोपांपासून लोंब्या बाहेर पडत नाहीत. जर पडल्याच तर दाणे पोचट असतात.
या किडीच्या नियंत्रणासाठी रोपे अत्यंत दाट लावू नयेत. दोन ओळीतील अंतर २० सेंटीमीटर व दोन चुडातील अंतर १५ सेंटीमीटर पुरेसे आहे. शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या क्षेत्रासाठी नत्र खताच्या मात्रा वाजवी प्रमाणात द्याव्यात. लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. कीड नियंत्रणासाठी कीड प्रादुर्भावावर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर एका बुंध्यावर पाच ते दहा तुडतुडे असतील तर कीटकनाशकांचा वापर करावा. फवारणीसाठी ५०० लिटर पाण्यातून अॅसिफेट ७५ टक्के, १०४० ग्रॅम किंवा फिप्रोनिल पाच टक्के (प्र), १००० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के १०० मिली किंवा २५ टक्के डब्ल्यू. जी. थायामेथोक्झाम १०० ग्रॅम यापैकी एका कीटकनाशकांची फवारणी करावी. कीटकनाशक बुंध्यावर पडेल अशी दक्षता घ्यावी.
भातावर निळे भुंगेरे प्रादुर्भावाचा धोका आहे. हे भुंगेरे निळ्या रंगाचे असून, अळी भुरकट पांढन्या रंगाची असते. या किडीच्या अळीची अवस्था, प्रौढावस्था दोन्हीही हानिकारक आहेत. ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते. परिणामी पानांवर पांढरे डाग असतात. या किडीचा प्रादुर्भाव पाणथळ जमिनी, नत्र खताचा प्रमाणापेक्षा जास्त वापरामुळे होऊ शकतो. ही कीड पानाचा प्रादुर्भाव पाणथळ जमीन व नत्र खताच्या अवाजवी वापराने होऊ शकतो. ही कीड भातपिकानंतर बांधावरील गवतावर व कापणीनंतरच्या भाताच्या फुटव्यावर उपजीविका करते. जमिनीत पाणी जास्त काळ न साठता निचरा होईल याची काळजी घ्यावी.
पाने गुंडाळणारी अळीया किडीचे पतंग सोनेरी फिकट पिवळसर रंगाचे असतात. त्यांच्या पंखावर काळी नागमोडी नक्षी असते. पंखाच्या कडा काळसर धुरकट असतात. अंड्यातून बाहेर पडलेली अळी पांढरट हिरव्या रंगाची असते. पूर्ण वाढलेली अळी पिवळसर हिरवट असते. डोके मात्र काळसर असते. अळी नेहमी पानाच्या गुंडाळीत असते. गुंडाळीस स्पर्श केल्यास अळी अतिशय जलद गतीने त्यातून बाहेर पडते आणि शरीराची वेडीवाकडी हालचाल करते. अळी पानाच्या दोन्ही कडा एकत्र चिकटवून पानाची गुंडाळी करते व त्यात राहते व आतील पृष्ठभागातील हरितद्रव्य खाते.