Lokmat Agro >शेतशिवार > टोमॅटो पिकावरील किडींचे नियंत्रण कसे कराल?

टोमॅटो पिकावरील किडींचे नियंत्रण कसे कराल?

How to control pest and disease on tomato crop? | टोमॅटो पिकावरील किडींचे नियंत्रण कसे कराल?

टोमॅटो पिकावरील किडींचे नियंत्रण कसे कराल?

टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक अशा टोमॅटोच्या वाणांची निवड करावी.

टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक अशा टोमॅटोच्या वाणांची निवड करावी.

शेअर :

Join us
Join usNext

टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा या किडीमार्फत होतो. विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर औषधांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे हाच एक उपाय आहे. या रोगाची लागण रोपवाटिकेपासून पिकाच्या वाढीपर्यंत केव्हाही होते म्हणून त्याच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच काळजी घेणे महत्वाचे आहे. संचालक (फलोत्‍पादन) डॉ. कैलास मोते यांनी टोमॅटो पिकांवरील कीड आणि रोगाचे नियंत्रण कसे करावे याबाबत दिलेली माहिती.

टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक अशा टोमॅटोच्या वाणांची निवड करावी. शेतकऱ्यांना जर स्वतः च्या शेतात रोपे तयार करणे शक्य नसेल, तर बाहेरुन रोपे घेताना ते परवानाधारक रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत तसेच त्या रोपवाटिकेला इन्सेक्ट नेट, विड मॅट, दोन दरवाजे पध्दत व रोपवाटीकेच्या नियमावली प्रमाणे असावी. रोपे खरेदी करताना ज्या भागांमध्ये टोमॅटो पिकावर विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणच्या रोपवाटिकेतून रोपे खरेदी करु नयेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • रोपवाटीकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादी वाफ्यावर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड २ मिटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे, यामुळे रोगप्रसार करणाऱ्या किडींपासून रोपांचे संरक्षण होईल. रोपवाटिकेमध्ये रसशोषक किडी (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. पुनर्लागवडीसाठी २५-३० दिवसांची रोपे पुरेसे हार्डनिंग करुन वापरावेत. पुनर्लागवडीच्यावेळी वाफ्यावर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. यामुळे पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
  • रोपाची पुनर्लागवड करण्यापूर्वी २५-३० दिवस अगोदर शेताच्या सर्व बाजूने ५-६ ओळी मका किंवा ज्वारी किंवा बाजरी अशी सापळा पिके म्हणून लावावे. त्यामुळे पांढऱ्या माशीला मोठ्या प्रमाणात अटकाव होतो. रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी इमिडॅक्लोप्रीड (१७.८एस.एल.) ४ मिली प्रति १० लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे १०-१५ मिनिट बुडवावी. टोमॅटो पिकास शिफारशी प्रमाणे खतांच्या मात्रा द्याव्यात. तसेच नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळावा.
  • टोमॅटो पिकाला आवश्यकतेप्रमाणेच पाणी द्यावे व पीक तण विरहित ठेवावे. ज्या भागात/शेतात वर्षानुवर्षे तिन्ही हंगामात टोमॅटो पीक घेतले जाते अशा ठिकाणी रोग व किडी प्रस्थापित झालेले असतात त्यामुळे पीक पद्धतीतील अशी साखळी खंडीत करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रति एकर ३०-३५ निळे व पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत. टोमॅटोवरील टुटा नागअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी २० कामगंध जलसापळे (वॉटर ट्रॅप) लावावेत यामुळे टूटा किडीचे सामूहिक पतंग आकर्षण व मिलन प्रजोत्पादनामधील अडथळयांसाठी उपयोग होऊन किडींची संख्या आणि प्रादुर्भाव कमी करता येईल. टोमॅटोच्या फळांची शेवटची तोडणी झाल्यास झाडे उपटून नष्ट करावेत. रोगग्रस्त पीक शेतात तसेच राहिल्यास नवीन लागवड केलेल्या पिकांवर अशा किडींव्दारे पुन्हा प्रसार होऊन विषाणू रोगांचा प्रादुर्भाव होतो.

उपचारात्मक उपाययोजना

  • टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेला असेल तर विषाणूजन्य रोगांच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी खालील उपचारात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे व फळे काढुन वेळीच नष्ट करावीत जेणेकरून पुढील प्रसार टाळता येईल. रसशोषक किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी लेकॅनीसिलियम लेकॅनी ५० ग्रॅम किंवा मेटॅ-हाझीयम अॅनीसोप्ली (१.१५ डब्लू.जी.) ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात वातावरणात आर्द्रता असताना संध्याकाळी फवारणी करावी.
  • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८% एस.एल ३ मिली किंवा स्पायरोमेसिफेन (२२.१०% डब्लू डब्लू एस.सी.) १२ मिली किंवा थायोमेथोक्झाम (२५% डब्लू. जी.) ४ ग्रॅम किंवा प्रॉपरगाईट (५०%) अधिक बायफेनथ्रीन (५% एस.इ.) २२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फुलकिडे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (७०% डब्लू. जी.) २ ग्रॅम किंवा सायॅनटॅनीलीप्रोल (१०.२६% ओ.डी.) १८ मिली किंवा थायमिथोक्झम (१२.६०%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५०% झेड. सी.) २.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात.
  • मावा किडीच्या नियंत्रणसाठी सायनट्रॅनिलीप्रोल १०.२६ ओ.डी. १८ मिली किंवा डायमिथोएट (३०% ई.सी.) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टूटा नागअळीच्या नियंत्रणासाठी सायनट्रॅनिलीप्रोल १०. २६ ओ.डी. १८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लाल कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी प्रॉपरगाईट (५०%) डब्लू / डब्लू अधिक बायफेथ्रीन (५% एस. इ.) २२मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनऍनीलीप्रोल १८.५० एस.सी. ३ मिली किंवा इन्डोक्झाकार्ब १४.५० एस.सी. १० मिली किंवा नोव्हॅल्युरॉन १० ई.सी. १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई. सी. २० मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा प्रॉपीनेब ३० ग्रॅम प्रति १० लिटरपाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
  • फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना टोमॅटो पिकावरील किड व रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी उपाययोजना सुचविण्यात येतात. त्या उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेवर केल्यास टोमॅटो पिकावरील कीड रोखण्यास निश्चितच होईल.

Web Title: How to control pest and disease on tomato crop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.