तूर हे राज्यातील एक प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. राज्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पिकात उत्पादनात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. सध्या तूर पीक फुलोऱ्यावर व शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत होऊ शकतो. त्यानुषंगाने शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना करून या किडीचे नियंत्रण करावे.
किडीची ओळख
या किडीचा पतंग शरीराने दणकट व पिवळसर रंगाचा असतो. अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची व गोलाकार असतात. या अंडीचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटाकार असतो. कोष गडद तपकिरी रंगाचा असतो. मादी नरापेक्षा मोठी असून तिच्या शरीराच्या मागील भागांवर केसांचा झुपका असतो.
नुकसानीचा प्रकार
अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीस सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठे कुरतुडून खातात. अळी लहान असतांना कळी फुलोऱ्यावर तर मोठी अळी मुख्यत: शेंगावर आक्रमण करते. ही अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील दाने खाते.
एकात्मिक व्यवस्थापन
- पिकात हेक्टरी १० कामगंध सापळे उभारावेत, यामुळे या अळीचे सर्वेक्षण व काही प्रमाणत नियंत्रण करण्यास मदत होईल.
- पक्षांसाठी प्रती हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत.
- सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव कमी असल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- घाटे अळीचा विषाणू (एच. ए. एन. पी.व्ही.) प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क (१ X १०९ तीव्रतेचा) फवारावा.
- आर्थिक नुकसान पातळी (१० -१५ % प्रादुर्भाव ग्रस्त झाडे) ओलांडल्यास क्लोरॅनट्रॅनीलीप्रोल १८.५ एस २.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट ५ एस जी ४.४ ग्रॅम किंवा लॅम्बडा-सायलोथ्रिन ५ ई सी १० मिली किंवा फ्लूबेंडामाईड ३९.३५ एस सी २ मिली प्रती १० लिटर पाण्यात या रासायनिक कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करावा.
क्रॉपसॅप प्रकल्पा अंतर्गत पिक सरंक्षण सल्ला
कृषि विभाग, महाराष्ट्र शासन