महाराष्ट्रातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी ८५ टक्के जमीन कोरडवाहू आहे. कोरडवाहू फळपिकातील सिताफळ हे एक महत्वाचे पीक म्हणुन ओळखले जाते. हे फळ दक्षिण विभागामध्ये सिताफळ या नावाने ओळखले जाते तर उत्तर विभागामध्ये शरिफा या नावाने ओळखले जाते.
सिताफळाचे झाड अतिशय काटक, अत्यल्प पाण्यावर वाढणारे असुन सध्या महाराष्ट्रामध्ये बीड, औरंगाबाद (दौलताबाद), अहमदनगर, सोलापुर, नाशिक, पुणे, जळगाव इ. जिल्हयांमध्ये हलक्या जमिनीवर या कोरडवाहू फळपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. सिताफळाच्या वैशिष्ट्यपुर्ण स्वादामुळे इतर फळांपेक्षा त्यास विषेश महत्व आहे. सिताफळ चवीला गोड असल्यामुळे या फळाला ग्रामीण व शहरीभागामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. सिताफळाच्या पानांचा रस किटकनाशक म्हणुनही वापरता येतो.
हवामानसिताफळाच्या योग्य वाढीसाठी कोरडे व उष्ण हवामान झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक असुन साधारण ३० ते ४० अंश सेल्सीअस तापमान व ५०० ते ७५० मि.मी. पाउस असणा-या प्रदेशामध्ये उत्कृष्ट प्रकारे लागवड करता येते. अति व सलग दुष्काळ या पिकास हानिकारक ठरु शकतो. अति कोरड्या हवामानात परागसिंचनावर विपरीत परिणाम होवून फळधारणा कमी प्रमाणात होते. आद्रता असलेल्या हवामानात सिताफळ चांगले येत नाही. कडक थंडी, धुके व वातावरणामध्ये आद्रता खुप वाढली तर या फळझाडांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव दिसुन येतो.
जमीनसिताफळ हे सर्व प्रकारच्या जमिनीत व्यवस्थित येवू शकते. त्यामुळे सिताफळाची लागवड डोंगर उतार तसेच उधड जमिनीतही केलेली दिसुन येते. जमिनीचा सामू ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. सिताफळाची मुळे जमिनीत खोलवर जात नाही. ती वरच्या थरातच राहतात. त्यासाठी उत्तम निचरा होणारी हलकी, मुरमाड, मध्यम खोलीची जमीन सिताफळ लागवडीस योग्य असते. परंतु जास्त चुनखडी, भारी, काळी व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनी सिताफळ लागवडीसअयोग्य ठरतात.
जातीसिताफळामध्ये साधारतः ४० ते ५० विविध प्रजाती असुन सुमारे ११९ जाती आहेत. महाराष्ट्रमध्ये लागवडीसाठी बाळानगर, फुले पुरंदर, अर्का सहान, धारूर ६, लाल सिताफळ, वॉशिंग्टन इ. जातींची लागवड मोठया प्रमाणात करतात. महाराष्ट्रात बाळानगर ह्या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या जातीची फळे आकाराने मोठी असून गराचे प्रमाण जास्त असते तर बियांचे प्रमाण कमी असते व गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. बंगलरू येथील आय.आय.एच.आर. या संस्थेने सीताफळाची अर्का सहान ही जात विकसित केली आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीव्दारे सन २०१७ साली फुले जानकी नावाची संकरीत सिताफळाची जात प्रसारित केली आहे. अधिक उत्पादन, फळांचा आकर्षक हिरवा रंग, एकसारखा मोठा आकार, भरपुर गर आणि कमी बिया अशी वैशिष्ठ्य पुर्ण गुणधर्म असणारी ही जात महाराष्ट्र राज्यामध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
अभिवृध्दीसिताफळाची अभिवृध्दी बियांपासून रोपे तयार करुन केली जाते किंवा शाखीय पध्दतीनेही करतात.१) बियांपासून तयार केलेल्या रोपांचे गुणधर्म एकसारखे नसतात त्यामुळे उत्पन्न व गुणवत्ता यात विविधता दिसून येते.२) शाखीय पध्दतीने भेटकलम करुन किंवा डोळे भरुन सिताफळाची अभिवृध्दी करता येते.
लागवड व अंतरसिताफळाची लागवड साधारणतः जून-जुलै किंवा पाण्याची व्यवस्था असल्यास जानेवारी फेब्रुवारीमध्ये करावी. हलक्या व मुरमाड जमिनीत ५ x ५ मी. अंतरावर लागवड करावी व भारी जमिनीत ६४६ मी. अंतरावर लागवड करावी. सुरुवातीला लागवडीच्या वेळेस ६०x६०x६० से. मी. आकाराचे खड्डे मार्च-एप्रिल महिन्यात खोदावेत. जुन महिन्याच्या सुरुवातीस खड्ड्यात तळाशी पालापाचोळा टाकावा, १ ते १.५ घमेले चांगले कुजलेले शेणखत व त्यामध्ये १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, मिथील पॅराथिऑन १.५ टक्के पावडर मिसळावे व खड्डा भरून घ्यावा. पहिला पाउस पडल्यानंतर रोपांची लागवड करावी.
आंतरपिके व तण नियंत्रण सिताफळाची लागवड हलक्या, मुरमाड जमिनीत केली जात असल्यामुळे अशा जमिनीचा पोत व कस टिकविण्यासाठी लागवडीनंतर सुरवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्ये कांदा, काकडी, मुग, चवळी, सोयाबीन, यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत.
बागेतील तण हे सूर्यप्रकाश, पाणी, हवा यासाठी सिताफळाच्या झाडांशी स्पर्धा करते. त्यामुळे उत्पादन कमी होते. म्हणून वेळोवेळी खुरपणी करून तण काढून टाकावे. ताग, धैंचा यासारखी हिरवळीची खते झाडामधील मोकळ्या जागेत घेतल्यास तणांच्या वाढीस प्रतिबंध होतो व हिरवळीची खते म्हणून वापर होतो. आच्छादन व तणनाशके आपण तण नियंत्रणासाठी वापरु शकतो.
अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पउद्यानविद्या विभाग, मफुकृवि, राहुरी०२४२६-२४३४४७