कांदा हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य व विशेषतः लहान व मध्यम शेतकऱ्यांचे महत्वाचे नगदी पीक आहे. त्यामुळे त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान या पिकावर अवलंबुन आहे. भारतात कांद्याची लागवड मुख्यतः रब्बी हंगामात होते. महाराष्ट्रात कांद्याची तिनही हंगामात (उदा. खरीप, रांगडा व रब्बी) लागवड केली जाते. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे बारामाही पाणीपुरपठा उपलब्ध नाही तसेच फारशा साधनसामुग्री उपलब्ध नाहीत असा शेतकरी नगदी उत्पादनासाठी मुख्यतः कांदा पिकावरच अवलंबून आहे.
कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्रप्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. देशाचे २५ टक्के उत्पादन एकटया महाराष्ट्रात आहे. नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील ३७ टक्के तर देशातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकटया नाशिक जिल्ह्यात होते. मात्र या महत्वाच्या पिकात बाजारभावातील सततच्या चढउतारामुळे कायमस्वरुपी अस्थिरता आढळते. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कांद्यावर संशोधन करुन कांद्याचे उत्पादन व साठवणक्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त असे कांदा काढणी अगोदरचे व कांदा काढणीनंतरचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
सुधारित जातीरांगडा हंगामामध्ये फुले समर्थ, बसवंत- ७८० यासारख्या जातींची उत्तम साठवणूकक्षमता असलेले कांद्याचे वाण वापरले जातात. याव्यतिरिक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठाने फुले समर्थ, बसवंत ७८०, एन-२-४-१ हा रांगडा लागवडीकरिता विकसित केलेला आहे. देशात तसेच महाराष्ट्रात या हंगामात प्रामुख्याने कांदा लागवड होते व या हंगामाची उत्पादन तसेच साठवणक्षमता खरिप हंगामापेक्षा उत्कृष्ट असते.
उत्तम दर्जाच्या कांदा बियाण्याची निवड करावीकांदा साठवणुकीत चांगल्याप्रकारे टिकलेल्या कांदा गोटापासुन दीड किलोमीटर सुरक्षित असे विलगीकरण अंतर ठेवून बिजोत्पादन केले तरच त्या जातीमधील साठवणक्षमता बियामध्ये टिकून राहते. अशा साठविलेल्या कांदा गोटापासून तयार केलेले खात्रीलायक व उत्तम दर्जाच्या बियाण्याची लागवडीसाठी निवड करावी.
जमिनीची पूर्वमशागत व पुर्नलागवड रोपवाटिका तयार करणे रांगडा हंगामासाठी ऑगस्ट-सप्टें. महिन्यामध्ये रोपवाटीका तयार करावी व सप्टें ऑक्टो महिन्यात रोपांची पूर्नलागवड करावी. कांदा लागवडीसाठी एकसारखी रोपे वापरल्यामुळे एकसारख्या कांद्याचे उत्पादन मिळण्यास मदत होते व असा कांदा साठवणूकीसाठी योग्य असतो. तेव्हा रोपवाटीकेत रोपांची एकसारखी वाढ होण्याकरिता ३x२ मीटर आकाराचा गादीवाफा तयार करावा. प्रत्येक गादीवाफ्यात साधारणपणे दोन घमेले शेणखत, २५० ग्रॅम सुफला (१५:१५:१५) व २० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड (ब्लायटॉक्स) ची पावडर मिसळावी. प्रत्येक वाफ्यात १० से.मी. अंतराच्या ओळीमध्ये बियाणे पातळ पेरावे. बियाणे उगवल्यानंतर १५ दिवसांनी दोन ओळींमध्ये हलकीशी खुरपणी देवून प्रत्येक वाफ्यास ५० ग्रॅम युरिया व ५ ग्रॅम थिमेट द्यावे. एक महिन्यानंतर १० लिटर पाण्यात १० मि.ली. रोगर+२५ ग्रॅम डायथेन एम-४५+१० मि.ली. चिकट द्रव्य मिसळून एक फवारणी द्यावी. सहा ते आठ आठवड्यानंतर एकसारख्या आकाराची जोमदार रोपे लागवडीसाठी वापरावीत.
खते व्यवस्थापनकांदा पिकास भरखते म्हणून शेणखत हेक्टरी २० टन मशागतीचे वेळी द्यावे. तसेच वरखते म्हणून रासायनिक खते हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी वाफ्यात मिसळून द्यावे तर ५० किलो नत्र ३० दिवसांनी लागवडीनंतर द्यावे. माती परिक्षणानुसार खते देणे फायदेशीर ठरते. कांदा पातीची वाढ पूर्ण झाल्यानंतर नत्राची आवश्यकता नसते. कांदा लागवडीनंतर ६० दिवसांनी कुठलेही रासायनिक खते देऊ नये. नत्राची मात्रा अधिक किंवा उशिरा दिली तर डेंगळे येणे, जोड कांदा येणे, कांदा साठवणीत सडणे हे प्रकार होतात. कांद्याची साठवणक्षमता वाढविणेसाठी तसेच जमिनीची भुसभुशीतपणा टिकवून ठेवण्यासाठी अमोनियम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश या गंधकयुक्त खतांचा वापर करावा.
कोरडीत दाट लागण करणेहंमामानुसार कांद्याची लागवड सपाट वाफा किंवा सरी वरंबा पध्दतीने करावी. कोरड्या वाफ्यात लसणासारखी कांदा रोपांची लागवड केल्यास, प्रत्येक वाफ्यातील रोपांची संख्या योग्य राखता येते व त्यामुळे लागवड दाट होवून मध्यम आकाराच्या एकसारख्या कांद्याचे चांगले उत्पादन मिळते. तसेच हे कांदे साठवणुकीसाठी योग्य असतात. रब्बी किंवा उन्हाळी हंगामाकरिता दोन ओळींतील अंतर १५ x १० तर दोन रोपांमधील अंतर (३ इंच) राखल्यास २५-३० टन उत्पादन मिळते. तसेच खरीप व रांगडा हंमामामध्ये १५ x १० से. मी. अंतरावर लागवड करावी. कोरड्या वाफ्यात लागवड केल्यावर वाफ्यामध्ये पाणी हळूवार सोडावे तसेच पाणी रोपांच्या विरुध्द दिशेने द्यावे म्हणजे रोपे वाहून जाणार नाहीत. तसेच आंबवणीचे पाणी देताना नांगे पडले असल्यास न चुकता नांगे भरावेत. कांद्याच्या ओल्या लागवडीमध्ये रोपांची संख्या योग्य प्रमाणात राखता येत नसल्यामुळे रोपांची विरळ व तुटक लागवड होवून वेगवेगळया आकाराच्या कांद्याचे उत्पादन होते व उत्पादनामध्ये ३० ते ४० टक्के घट येवू शकते.
रासायनिक तणनाशकांचा वापर करणेलागवडीनंतर सुरुवातीच्या काळात कांदा रोपाची वाढ मंद गतीने होत असते. परंतु तणांची वाढ झपाटयाने होत असल्यामुळे रोपांची वाढ खुंटते. त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम होतो. म्हणून लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात रान तणविरहीत ठेवण्यासाठी लागवडीनंतर २१ दिवसांनी ऑक्झीफ्लोरफेन २३.५ टक्के ई. सी. १२.५ मिली व क्यझेलफॉफ इथाईल ५ टक्के ई.सी. १० मिली. प्रति १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कांदा साठवण योजना, उद्यानविद्या विभागमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी०२४२६ २४३३४२