Lokmat Agro >शेतशिवार > रब्बी ज्वारीची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?

रब्बी ज्वारीची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?

How to cultivate rabbi sorghum in improved method? | रब्बी ज्वारीची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?

रब्बी ज्वारीची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?

ज्वारीच्या एकूण जागतीक उत्पन्नापैकी ५५ टक्के ज्वारी अन्नधान्य म्हणून व ३३ टक्के ज्वारी पशुखाद्य म्हणून वापरली जाते. रब्बी ज्वारीचे उत्पादन व लागवड या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे.

ज्वारीच्या एकूण जागतीक उत्पन्नापैकी ५५ टक्के ज्वारी अन्नधान्य म्हणून व ३३ टक्के ज्वारी पशुखाद्य म्हणून वापरली जाते. रब्बी ज्वारीचे उत्पादन व लागवड या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रब्बी ज्वारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे पीक आहे. या अन्नधान्याचा अन्न म्हणून प्रामुख्याने उपयोग करतात. ज्वारीच्या एकूण जागतीक उत्पन्नापैकी ५५ टक्के ज्वारी अन्नधान्य म्हणून व ३३ टक्के ज्वारी पशुखाद्य म्हणून वापरली जाते. रब्बी ज्वारीचे उत्पादन व लागवड या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. गेल्या ६० वर्षांच्या आकडेवारी वरुन असे लक्षात येते की, ६० टक्के रब्बी ज्वारीचे उत्पादन आपल्या राज्यात होते.

जागतीक तापमानवाढीमुळे भविष्यात गव्हाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे व गहू या पिकास रब्बी ज्वारी हे महत्वाचे दुसरे पर्यायी पीक आहे. कारण रब्बी ज्वारी तापमानातील चढ ऊतारामध्ये तग धरु शकते. रब्बी ज्वारी हे अवर्षण प्रवण भागातील जिरायत पीक असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुधारायचे असेल तर त्यासाठी रब्बी ज्वारी व त्यापासून तयार केलेले विविध पदार्थ यांना चांगला भाव मिळण्याची गरज आहे. ज्वारीला मानवी आहारामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे कारण ज्वारीच्या आहारामुळे मानवास होणाऱ्या घातक आजारांपासून संरक्षण मिळते.

सध्याची रब्बी ज्वारीची उत्पादकता वाढावयाची असेल तर आपणांस कोरडवाहूखाली रब्बी ज्वारीसाठी विद्यापीठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब व रब्बी ज्वारीचे या विद्यापीठाने प्रसारित केलेले नविन सुधारीत वाण वापरल्यास अधिक धान्य व कडबा उत्पादन मिळण्यास शेतकऱ्यांना निश्चित मदत होईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. केंद्र शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास सदरहु लेखाची मदत होईल.

मुलस्थानी पाणी व्यवस्थापन
महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी असण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे हे पीक मोठया प्रमाणावर कोरडवाहू भागात खरीप हंगामात पडणाऱ्या पावसाच्या जमिनीतील साठविलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीवर (२३ % हलकी जमीन, ४८ % मध्यम जमीन व २९ % भारी जमीन) सर्वसाधारणपणे ५.५ ते ८.५ सामु असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते. रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची मशागत पेरणीपूर्वी करावी. ज्वारी पेरणीपूर्वी जमिनीची नांगरट केल्यास जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते. त्याकरीता नांगरट, कुळवाच्या पाळ्या इत्यादी मशागतीची कामे उतारास आडवी करावी.

पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीची बांधणी करावी. त्यासाठी १०x१० चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावेत. सारा यंत्राने सारे पाहून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात किंवा २ मीटर अंतरावर सारा यंत्राने सारे पाडून दर ६ मीटर वर बळीराम नांगराच्या सहाय्याने दंड टाकावेत. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. ही कामे जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात करावीत. त्यामुळे १५ जुलै ते १५ सप्टेंबर या काळातील पाणी जमिनीत मुरविले जाते व त्याचा उपयोग ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होतो. पेरणी ही तिफणीने दोन चाड्याच्या पाभरीने करावी.

दोन ओळीतील अंतर ४५ से.मी. व दोन रोपातील अंतर १५ से.मी. इतके ठेवावे. पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. अनुवंशिकतेनुसार ज्वारीचे शुध्द बियाणे वापरावे. संकरित ज्वारीचे बियाणे फक्त मोहोरबंद पिशवीतील प्रमाणित बियाणे वापरावे. योग्यवेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. मुलस्थानी पाणी व्यवस्थापनामुळे उत्पादनात ३० टक्के वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे.

रब्बी ज्वारी पेरताय, कोणत्या वाणांची निवड कराल?

पेरणी नंतरचे ओलावा व्यवस्थापन
पिकाच्या सुरुवातीच्या ३५ ते ४० दिवसात तण व पिकामध्ये अन्नद्रव्य जमिनीतून शोषणसाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस ३५ ते ४० दिवसात पीक तणविरहित ठेवणे महत्वाचे आहे. पेरणी नंतरच्या ओलावा व्यवस्थापनामध्ये १८ इंच पाभरीने पेरणी करून ४५ x १५ सेमी अंतर राखणे तसेच पेरणी नंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करुन एका ठिकाणी एकच ठोंब ठेवावा. पहिली कोळपणी पेरणी नंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी. या कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त होऊन मातीचा थर जमिनीवर तयार होऊन मातीचे आच्छादन तयार होते. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवडयांनी करावी त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो. पीक ८ आठवडयांचे झाल्यानंतर दातेरी कोळप्याने तिसरी कोळपणी कोळप्याला दोरी बांधून करावी त्यामुळे जमिनींच्या भेगा बुजण्यास मदत होऊन पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाईल व शेतात सऱ्या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरून ठेवण्यास मदत होईल. या कोळपणीमुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी करावी. कोरडवाहु ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजुक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. बागायती ज्वारीमध्ये तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात असतांना पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरतांना पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी द्यावे. पेरणी नंतरचे ओलावा व्यवस्थापनामुळे उत्पादनात २० टक्के भरीव वाढ होते असे प्रयोगांती सिध्द झाले आहे.

अन्नद्रव्य व्यवस्थापन
जिवाणू खतांचा वापर रब्बी ज्वारीस १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोस्पिरिलम किंवा पी.एस.बी. या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. या खतांपासून १५ ते २० टक्के उत्पादन वाढते. असे प्रयोगाअंती आढळून आले आहे. जिवाणू खतांची पाकिटे जिल्हा परिषदा, कृषि खाते, कृषि विद्यापीठे, कृषि महाविद्यालये आणि कृषि सेवा केंद्रे यांच्याकडे उपलब्ध असतात.
रासायनिक खतांचा वापर
रबी ज्वारीच्या संकरीत व सुधारित जाती नत्र खतास चांगला प्रतिसाद देतात. कोरडवाहु ज्वारीस प्रति १ किलो नत्र दिल्यास १० ते १५ किलो धान्य उत्पन्न वाढत असल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे.

जमिनीच्या प्रकारानुसार खालीलप्रमाणे रासायनिक खतांची शिफारस केलेली आहे
कोरडवाहूसाठी/खताचे हेक्टरी प्रमाण (किलो)
जमिनीचा प्रकार    नत्र       स्फुरद     पालाश
हलकी                   २५           -            -
मध्यम                    ४०         २०           -
भारी                      ६०         ३०            -

बागायतीसाठी/खताचे हेक्टरी प्रमाण (किलो)
जमिनीचा प्रकार    नत्र       स्फुरद    पालाश
हलकी                     -           -              -
मध्यम                    ८०*       ४०          ५०
भारी                      १००*      ५०          ५०

*नत्र दोन हप्त्यात (पेरणीवेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्ध) संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी वेळेस द्यावे. कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र पेरणीवेळेस द्यावे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये रासायनिक खते पेरणीच्या वेळी दिल्यास उत्पादनात १५ टक्के वाढ होते.

ज्वारी सुधार प्रकल्प
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
०२४२६ २३३०८०

Web Title: How to cultivate rabbi sorghum in improved method?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.