Join us

सुधारित पद्धतीने करडई पिकाची लागवड कशी कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 12:44 PM

महाराष्ट्र व कर्नाटक हे भारतातील दोन अतिशय महत्त्वाचे करडई लागवडीखालील राज्य असून अनुक्रमे ६२ टक्के व २३ टक्के क्षेत्र आणि ६३ टक्के व ३५ टक्के उत्पादकता या दोन राज्यांची आहे.

करडई हे रबी हंगामातील महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. महाराष्ट्र व कर्नाटक हे भारतातील दोन अतिशय महत्त्वाचे करडई लागवडीखालील राज्य असून अनुक्रमे ६२ टक्के व २३ टक्के क्षेत्र आणि ६३ टक्के व ३५ टक्के उत्पादकता या दोन राज्यांची आहे. या पीकाची कोरडवाहू हवामानात तग धरुन राहण्याची क्षमतेमुळे, भारतातील परंपरागत कोरडवाहू पिकाऐवजी करडई हे मुख्य पीक म्हणून लागवड करण्यास मोठा वाव आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारीत लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करुन पीकसंरक्षणाकडे वेळेवर लक्ष दिल्यास कोरडवाहू क्षेत्रात उत्पादन वाढवता येते.

हवामानमहाराष्ट्रात करडईची लागवड रबी हंगामात केली जाते. करडई पीकास अतिशय थंड किंवा गरम हवामान अयोग्य आहे कमी तापमानास रोपअवस्था व कायीकवाढीच्या अवस्था सहनशिल असून फुलोरा व परिपक्वतेचा कालावधी संवेदनशील आहे. तुलनात्मकदृष्टया कोरड्या हवामानात करडई पीक चांगले येते. जास्त पाऊस किंवा आर्द्रता या मुळे रोगांचा प्रादूर्भाव वाढतो.

जमीनकरडई पीक मध्यम ते भारी, योग्य निचरा आसण्याऱ्या जमिनीत चांगल्याप्रकारे येते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्यम ते भारी काळ्या जमिनीवर करडई पीक घेतले जाते. हलक्या जमिनीवर नियमीतपणे सिंचन दिल्यासच चांगले उत्पादन मिळते. पाण्याचा योग्य निचरा होत नसेल तर अति पाऊस किंवा अतिसिंचन मुळकुजव्या व मर रोगास निमंत्रण देते. कमी निचरा असणारी भारी जमीन करडई पीकासाठी टाळावी. क्षारयुक्त जमिनीतही करडई पीक घेता येते.

वाणाची निवडअन्नेगीरी-१, एकेएस- ३२७, एसएसएफ-७०८, आयएसफ-७६४ या सारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची सुध्दा लागवड केली जाते. तसेच विद्यापीठ विकसित शारदा, परभणी कुसूम, (परभणी-१२), पुर्णा (परभणी-८६), परभणी - ४० (निम काटेरी) करडई इत्यादी वाण आपण लागवडीसाठी वापरू शकाल. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत जसे फुलोरा अवस्था, बोंडे पक्व होण्याची अवस्था व दाणे भरण्याची अवस्था या मध्ये संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात दीडपट ते दुप्पट वाढ होते. पाणी देण्यासाठी तुषारसिंचन पध्दतीचा उपयोग केल्यास पाण्याची बचत होते व पिकास योग्य प्रमाणात पाण्याची उपलब्धता होते.

पीक पध्दती करडई पीक निखोळ किंवा अंतर पीक पध्दतीत घेता येते. पावसावर अवलंबून असणाऱ्या भागात हरभरा अधिक करडई (६:२ किंवा ३:१), गहू अधिक करडई (३:१ किंवा २:१) व जवस अधिक करडई (३:१ किंवा ४:२) या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा. हमखास पावसाच्या भागात मूग, उडीद, सोयाबीन नंतर करडईचे पीक घ्यावे. सोयाबीन-करडई या दुबारपीक पध्दतीत देखील हे पीक चांगल्या प्रमाणात येते.

पूर्व मशागतखरिप पिकांच्या काढणीनंतर जमीन न नागरता २-३ पाळ्या देऊन काडीकचरा वेचून घ्यावा व करडईची पेरणी करावी. शुन्य मशागतीवर सुध्दा करडई लागवड केली जाते.

पेरणीहमखास पावसाच्या भागात सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते १५ ऑक्टोबर पर्यंत करडईची पेरणी करावी. बागायती करडईची पेरणी १५ ऑक्टोबर ते ५ नोंव्हेबर या कालावधीत करावी. जमिनीतील ओलीचा फायदा घेऊन तात्काळ पेरणी करावी. बागायती करडईसाठी पेरणी पूर्वी जमिनीतील ओलावा कमी असल्यास पाणी देऊन वापसा आल्यानंतर पेरणी करावी किंवा कोरड्यात पेरणी करुन नंतर हलके पाणी द्यावे.

बियाणाचे प्रमाण व लागवडीचे अंतरकरडईसाठी हेक्टरी १०-१२ किलो बियाणे लागते. पेरणीचे अंतर दोन ओळीत ४५ सें.मी. व दोन रोपात २० सें.मी ठेवावे. पेरणीपूर्वी ३ ग्राम थायरम/बाविस्टीन प्रतिकिलो बियाणास चोळावे.

खत व्यवस्थापनमराठवाड्यासाठी शिफारस केलेल्या खतांच्या मात्रा पुढीलप्रमाणे आहेत. माती तपासणी करुन खंताची मात्रा निश्चित करावी. जर खरीपात कडधान्य पीक घेतले असेल तर रबीमध्ये करडईस नत्राची शिफारशीच्या ५० टक्के मात्रा दयावी. जिरायती परिस्थितीत संपूर्ण खताची मात्रा पेरणीच्या वेळेस घावी. बागायती परिस्थितीत ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळेस व उर्वरीत नत्र पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिल्या पाण्याच्या पाळीस द्यावे.

क्षेत्र              खताचे प्रमाण (किलो/हेक्टर)                   नत्र          स्फुरद        पालाशजिरायत      ४०           २०              -बागायत      ६०           ४०              -      

विरळणीकरडई पिकाची विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पीक सरळ वाढते, फांद्या कमी फुटतात व बोंडांची संख्या कमी होउन उत्पादनात १५ ते ४० टक्यांपर्यंत घट होते. उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी अतिरिक्त रोपे उपटून काढावीत व दोन रोपांतील अंतर २० से. मी. ठेवावे.

आंतरमशागततणांच्या प्रादुर्भावानुसार एक ते दोन खुरपण्या व कोळपण्या पेरणी नंतर २५ ते ५० दिवसांपर्यत घ्याव्यात. ऑक्झोडायझोन १ किलो/हे. उगवणीपुर्वी किंवा फ्ल्युक्लोरॅलिन १ किलो/हे. पेरणी पुर्वी दिल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. काळ्या जमिनीत डिंसेबर महिण्याच्या नंतर भेगा पडतात, त्यासाठी भेगा वरुन माती टाकून बुजून टाकाव्यात.

पाणी व्यवस्थापनकोरडवाहू परिस्थितीत सुरुवातीला वाढीच्या काळात किंवा फुलोऱ्यात एक पाणी दिले तर उत्पादनात ४०-६० टक्के वाढ होते. बागायती परिस्थितीत कोरडवाहूपेक्षा साधारणताः दुप्पट उत्पादन मिळू शकते. करडई पीक हे अतिरीक्त पाण्यात अत्यंत संवेदनशील आहे. जमीन काळी, भारी, पाण्याचा योग्य निचरा न होणारी असेल तर अयोग्य सिंचनामुळे पाणी साचून मर व मुळ कुजव्या रोगास प्रोत्साहन मिळते. यासाठी करावा. त्यामुळे ४० ते ४५ टक्के पाण्याची बचत होते. तुषार सिंचनाचा वापर पेरणीपुर्वी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर हलके पाणी दयावे. त्यानंतर ३५ दिवसांनी आंतर मशागत केल्यानंतर व नत्राची मात्रा दिल्यानंतर एक पाणी द्यावे. ६५ ते ७० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असतांना पाणी द्यावे.

पीक संरक्षणकरडई पीकावर मावा, तुडतुडे आणि उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मावा किडीच्या नियंत्रणासाठी पेरणी वेळेवर करावी. या किडीचा प्रादुर्भाव दिसताच डायमिथोयट (०.०५ टक्के) फवारावे.करडई वरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी पिकाची फेरपालट करावी, बियाणास बुरशी नाशकाची प्रक्रीया करावी. पानांवरील ठिपक्याच्या नियंत्रणासाठी मँकोझेब (०.२५ टक्के) रोग दिसताच फवारावे.करडई पीकास पक्षी विशेषतः पोपट नुकसान करतात, त्यासाठी सकाळी व संध्याकाळी विशेष करुन दाणे भरण्याच्या ते परिपक्वतेच्या काळात उपाययोजना कराव्यात.

काढणी व मळणीकरडईचे पीक सर्वसाधारणपणे १३० ते १३५ दिवसात तयार होते. पिकाची कापणी सकाळी करावी म्हणजे काटे टोचत नाहीत आणि बोंडातील दाणेही गळत नाहीत. कापणी नंतर कडपे घालून वाळवावेत व मोगरीने / काठीने बडवून मळणी करावी. कंबाईन हार्वेस्टरचा काढणी साठी वापर करुन करडईचे पीक सलग व मोठ्या क्षेत्रावर घेतल्यास करडईचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यास मदत होईल. सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास करडईचे जिरायती मध्ये १०-१२ क्विं/हे. आणि बागायती परिस्थित २०- २५ क्विं/हे. उत्पादन मिळू शकते.

डॉ. शामराव भि. घुगे (करडई पैदासकार)डॉ. संतोष शिंदे (सहाय्यक कृषी विद्यावेत्ता) अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्प, व.ना.म.कृ.वि., परभणी

टॅग्स :पीकशेतीशेतकरीपेरणीरब्बी