कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते त्यामुळे व्यवस्थित नियोजनाने कोथिंबीर लागवड करून हमखास असा नफा मिळवता येतो. कोथिंबीर हे कमी वेळात येणारे चांगला आर्थिक नफा देऊन जाणारे उत्तम पीक आहे. साधारणतः कोथिंबिरीला वर्षभर बाजारात चांगल्या प्रकारची मागणी असते, व्यवस्थित तंत्रज्ञानाचा वापर करून आणि व्यवस्थित नियोजन केले तर कोथिंबीरीचे पीक हमखास भरघोस नफा मिळवून जाते.
कोथिंबिरीचा वापर हा अगदी घरापासून ते हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कोथिंबिरीला वर्षभर चांगली मागणी असते. कोथिंबिरीची लागवड ही प्रामुख्याने पावसाळी व हिवाळी हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे कोथिंबिरीचे उत्पादन कमी निघत असलेले तरी प्रचंड मागणीच्या तुलनेत पुरवठा हा फारच कमी असतो. त्यामुळे चांगला बाजार भाव मिळून उत्तम आर्थिक नफा मिळतो. कोथिंबिरामध्ये १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात पाण्याचे प्रमाण ८६%, प्रथिने ३.३%, कॅल्शियम ०.२%, जीवनसत्व क ०.१४% तसेच उष्मांक (कॅलरी) ४४५ आहे.
जमीनमध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमिन कोथिंबीर पिकासाठी योग्य असते. परंतु माती जर पोषणमूल्य भारित असेल तर हलक्या जमिनीतही कोथिंबीर शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. माती परीक्षण करून जर योग्य खतांचा पुरवठा केला तर जमिनीचा पोत सुधारून हलक्या जमिनीत सुद्धा कोथिंबिरीचे उत्पादन घेता येते. हलक्या जमिनीत उत्तम सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीची भौतिक गुणवत्ता सुधारता येते. त्यामुळे उत्पादनात वाढ होऊन कोथिंबिरीची गुणवत्ता सुद्धा उत्तम मिळते.
हवामानकोथिंबिरीची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. परंतु अति पाऊस असेल किंवा उन्हाळ्यात अति ऊन असेल तर कोथिंबीरीची वाढ हव्या त्या प्रमाणात होत नाही. पाण्याच्या स्रोत चांगला असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंचीर लागवड करून जास्त नफा मिळवता येऊ शकतो. उन्हाळ्यात तापमान ३५ अंश सेल्सिअस च्यावर गेल्यास कोथिंबिरीची वाढ कमी होते.
लागवडीचा हंगामकोथिंबिरीची लागवड रब्बी, खरीप आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात करता येते. उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्यात कोथिंबीरीचे उत्पादन घ्यावे.
लागवड पध्दतकोथिंबीरीची लागवड करण्याआधी जमीन नांगरून व कुळवून चांगली भुसभुशीत करून घ्यावी, जमिनीत एकरी ६ ते ८ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. त्यानंतर ३ x २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे. या वाफ्यात बी फेकून लागवड करू शकतो. बी फेकून लागवड करताना बी सारखे पडेल ह्याची काळजी घ्यावी. बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफयामध्ये १५ से.मी. अंतरावर खुरप्याने ओळी पाडून त्यात बी पेरु शकतो. उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करायची असेल तर पेरणी आधीच वाफे भिजवावे आणि मग वाफसा आल्यानंतर त्यात बी फेकून किंवा ओळी पाडून त्यात बी टाकून पेरणी करावी.
एकरी बियाणेकोथिंबीर लागवडीसाठी एकरी २५ ते ३५ किलो बियाणे लागते. लागवडी आधी धने हळुवार रगडुन फोडून घ्यावेत व त्यातील बी वेगळे करावे तसेच पेरणीपुर्वी धण्याचे बी भिजवून मग गोणपाटात गुंडाळून ठेवावे. त्यामुळे उगवण ८ ते १० दिवसात होते व कोथिंबीरीच्या उत्पा दनात वाढ होते, त्याचसोबत काढणी देखील लवकर होते.
सुधारित जाती१) लाम.सी.एस.-२ही जात मध्यम उंचीची, भरपूर फांद्या असलेली आणि झुडुपासारखी वाढणारी असते.२) लाम.सी.एस.-४ही जात झुडूप वजा वाढणारी असते भरपूर फांद्या आणि पाने असलेली असते, ह्या जातीची मुख्य काडी ही रंगीत असते. हि जात रोग आणि किडींना प्रतिकारक आहे.३) लाम.सी.एस.-६ही जात झुडूप वजा वाढणारी असते भरपूर फांद्या आणि पाने असलेली असते. ह्या जातीची मुख्य काडी ही रंगीत असते. हि जात भुरी रोगास प्रतिकारक आहे.४) को-१ही जात तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केली असून कोथिंबीर आणि पन्यासाठी चांगली आहे. या जातीचे ४० दिवसात हेक्टरी १० टन एवढे उत्पादन मिळते.५) कोकण कस्तुरीही जात बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी २०१३ साली विकसित केली असून ही जात अधिक सुगंधी असून पानांची संख्या अधिक आहे. हि जात अधिक उत्पादन देणारी असून हिरव्या पानांसाठी तसेच ५० दिवसापर्यंत रोग आणि किडींपासून मुक्त असून उन्हाळी आणि रबी हंगामासाठी उपयुक्त आहे.
खत व पाणी व्यवस्थापनकोथिंबीर लागवडी आधी जमिनीत एकरी ६ ते ८ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. बी उगवल्यानंतर २० दिवसांनी हेक्टरी ४० किलो नत्र द्यावे. त्याचसोबत २५ दिवसांनी १०० लिटर पाण्यात २५० ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारण्या करू शकतो ज्यामुळे कोथिंबीरीची वाढ चांगली होते, कोथिंबीर पिकाला नियमित पाणी गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये दर ५ दिवसांनी तर हिवाळ्यामध्ये ८० १० दिवसांनी पाणी द्यावे.
काढणी व उत्पादनपेरणी नंतर ३५ ते ४० दिवसानी कोथिचीर १५ ते २० से.मी. उंचीची होते त्यावेळी ती उपटून किंवा कापून काढणी करावी. पेरणीच्या २ महिन्यांनंतर कोथिंबीरीला फुले यायला सुरवात होते त्यामुळे त्या आधीच काढणी करणे महत्वाचे आहे. पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीचे एकरी ४ ते ६ टन उत्पादन मिळते तर उन्हाळी हंगामात हेच उत्पादन २.५ ते ३.५ टन मिळते.