राज्यात ऑक्टोबर हीटने काढता पाय घेतला असून हवेत गारठा जाणवू लागला आहे. शेतशिवारात खरीप पीकांच्या काढणीची लगबग सुरु असून अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बीच्या पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे.
मराठवाड्यात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. तसेच पुढील दोन दिवसात किमान तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होणार असून त्यानंतर पुन्हा तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मराठवाड्यात येत्या काळात तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी कोरड्या हवामानात पिकांचे व्यवस्थापन कसे करावे याची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शिफारस केली आहे.
कापूस
-वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी.-वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही.-बागायती कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी, फ्लोनिकॅमिड 50% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझिन 25% एससी 400 मिली किंवा डायनोटेफ्युरॉन 20% डब्ल्यूजी 60 ग्रॅम किंवा डायफेनथ्यूरॉन 50% डब्ल्यूपी 240 ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी.-कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. -कापूस पिकात पातेगळ व बोंडगळ दिसून येत असल्यास एनएए 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तूर
पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
पेरणीपूर्वी काय घ्याल काळजी?
-खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. -पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. -खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. -पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. -पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करता येते. -खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी सुर्यफुलाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. भारी जमिनीत पेरणी 60X30 सेंमी तर मध्यम जमिनीत 45X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.
फळबागांचे व्यवस्थापन
-पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या केळी बागेत तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. -केळी बागेत प्रति झाड 50 ग्रॅम पोटॅश खत मात्रा द्यावी. पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता छाटणी केल्यानंतर द्राक्ष बागेत 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. -पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.-आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी 13:00:45 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता असल्यास पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी.
मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.