कांदा आणि लसूण या पिकात प्रामुख्याने करपा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते. यात प्रामुख्याने करपा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो त्याचे नियंत्रण आणि एकात्मिक व्यवस्थापन कसे करायचे ते पाहूया.
करपा
अ) अल्टरनेरीया करपा
अल्टरनेरीया पोरी, अ. शेपूलीकोला नावाच्या बुरशीमुळे जांभळा करपा रोग येतो. या बुरशीजन्या रोगाचे प्रमाण खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे जास्त वाढते. रोगाच्या प्रादूर्भावामूळे काद्यांच्या पातीवर सुरुवातीला लहान, खोलगट पांढुरके चट्टे पडतात. चट्टे पडण्याची सुरुवात प्रथम शेंड्याकडून होवून पातीच्या खालच्या भागाकडे पसरतात. या चट्ट्याचा मध्यभाग जांभळट-लालसर रंगाचा होतो आणि कडा पिवळसर दिसतात दमट हवामानात रोगाचे प्रमाण वाढून या चट्ट्याच्या ठिकाणी तपकिरी किंवा काळपट बुरशीची वाढ होते. चट्ट्यांचे प्रमाण वाढल्यामूळे पाने शेंड्याकडून जळू लागतात व संपूर्ण पात जळाल्यासारखी दिसते.
बियाण्यासाठी लावलेल्या कांदयांच्या पातीवर रोग आल्यास त्याचा प्रादूर्भाव दांड्यावर होवून गोंड्यात बी भरत नाही आणि दांडे खाली कोलमडतात. पिकाच्या सुरुवातीच्या काळात रोग आल्यास पात जळून जाते, पिकाची वाढ चांगली होत नाही आणि कांदा न पोसल्यामूळे चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते. कांदे पोसण्याच्या काळात रोग आल्यास बुरशीचा प्रादूर्भाव काद्यापर्यंत पसरतो त्यामूळे कांदा सडतो. या रोगाचा प्रादूर्भाव साठवणीतही होतो. रोगाचा प्रथम प्रादूर्भाव रोगग्रस्त झाडाचे अवशेषापासून एका हंगामातून दुसऱ्या हंगामात तसेच दुय्यम प्रसार पाणी आणि हवेमार्फत झपाट्याने होतो.
ब) कोलिटोट्रीकम करपा
कोलिटोट्रीकम नावाच्या बुरशीमुळे काळा करपा रोगाचा प्रादूर्भाव खरीप हंगामात वाढतो. या रोगामूळे सुरुवातीच्या पानावर आणि मानेवर वर्तुळाकार काळे डाग पडतात. रोगाचे प्रमाण जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जास्त वाढून पाने करपतात व कंद सडतो पाण्याचा निचरा न झालेल्या ठिकाणी या रोगामुळे माना लांबलेल्या दिसतात.
क) स्टेम्फीलियम करपा
स्टेम्फीलियम व्हेसीकारिअम नावाच्या बुरशीमुळे तपकिरी करपा रब्बी हंगामात येतो, सुरुवातीला पानावर ते तपकिरी चट्टे पडतात. चट्ट्यांचे प्रमाण बुध्यांकडून शेंड्याकडे वाढत जावून पाने तपकिरी पडून सुकतात. पाती सुरकुतल्यासारख्या आणि शेंडे जळाल्यासारखे दिसतात.
ड) बोट्रायटीस करपा
बोट्रायटीस सिनेरी नावाच्या बुरशीमूळे पानावर असंख्य पांढरे ठिपके पडतात. फुलकिड्यांमुळे पानावर इजा होवून त्या ठिकाणी बुरशीचा प्रादूर्भाव होतो आणि रोगाचे प्रमाण वाढते. पानांचे शेंडे करपून पात जळते. या रोगाच्या प्रादूर्भावामूळे अल्टरनेरिया करपा रोगाची तिव्रता फार मोठ्या प्रमाणात वाढते.
उपाय:
- पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन २ ग्रॅम + बाविस्टीन २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी.
- पिकाची फेरपालट करावी तसेच जमिन उन्हाळयात चांगली नागरुण तापू द्यावी.
- रोपवाटिकेत रोपांची उगवण झाल्यानंतर १५ दिवसांपासून मँकोझेब २५ ग्रॅम + डायमेथोएट १५ मि.लि + चिकट द्रव्य १० मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी.
- पुर्नलागवड करण्यापूर्वी कांदा रोपांची मुळे मँकोझेब (२५ ग्रॅम/१० लि.पाणी) द्रावणात ५ ते १० मिनिटे बुडवून लावावीत.
- करपा आणि फुलकिडे नियंत्रणासाठी लागवडीनंतर रोगाची लक्षणे दिसताच दर १० दिवसांच्या अंतराने अझोक्झिस्टॉबीन १० मि.लि किंवा टेब्यकोनॅझोल १० मि.ली या बुरशीनाशकांची फवारणी जांभळा करपा आणि काळा करपा नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात मिसळून करावी किंवा मॅन्कोझेंब ३० ग्रॅम अधिक फिप्रोनिल ५ एस.सी १५ मि.लि प्रोफेनोफॉस ५० ईसी १० मि.ली किंवा कार्बोसल्फान २५ ईसी १० मि.ली सायपरमेथ्रिन ५ मि.ली अधिक स्टिकर १० मि.ली १० लि. पाण्यातून फवारणी करावी अथवा व्हर्टीसिलीयम किंवा मेटॅरिझम हे जैविक बुरशीनाशक ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात.
डॉ. आर.बी.सोनवणे, प्रा. आर.एम.बिराडे
कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव ब., ता. निफाड, जि.नाशिक