महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यत लागवड करणे फायद्याचे ठरते. यात प्रामुख्याने ज्या किड-रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यांचे एकात्मिक नियंत्रण कसे करायचे ते पाहूया.
किडींचे नियंत्रण
१) मावा
या किडीच्या नियंत्रणासाठी असिटामीप्रीड २०% एस.पी. ४ ग्रॅम किवा एमिडाक्लोप्रिड १७.८% एस.एल. ५ मिली किवा फिप्रोनील ५% एस.सी. १० ग्रॅम किवा थायमीथोक्झाम २५% ब्लु.पी. ३ ग्रॅम किवा डायमिथोएट ३०% ई.सी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
२ ) शेंगा पोखरणारी अळी
या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास खूप नुकसान होते. त्यासाठी क्लोरॲट्रानीलीप्रोल १८.५% एस.सी. ३ मिलि किवा इमामेक्टीन बेनझोएट ५% एस.सी. ३ ग्रॅम किवा क्लोरोपायरीफॉस २०% ई.सी. २० मिली. किंवा सायपरमेथ्रिन १० % ई.सी. ८ मिली. किंवा फिप्रोनील ५% एस.सी. १० मिली १० लिटर पाण्यातून फवारावे किंवा निंबोळी अर्क ५ टक्के फवारावे.
अधिक वाचा: ज्वारी पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
रोग नियंत्रण
१) मर
या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर किंवा कार्बेन्डॅझीम ३ ते ४ ग्रॅम किवा थायरम ३ ग्रॅम किवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. तसेच लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर ५ ते ६ किलो ट्रायकोडर्मा पावडर शेणखतात मिसळून जमिनीत मिसळावे. लागवड केल्यानंतर कार्बेन्डॅझीम २० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात घेऊन आळवणी करावी.
२) भुरी
शेंगा वीतभर झाल्यावर पावसाळी, ढगाळ वातावरणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक ८० टक्के २० ग्रॅम किंवा डिनोकॅप ४० डब्लुपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे किंवा गंधकाची भुकटी ३०० मेश प्रति हेक्टर २० किलो या प्रमाणात पिकावर धुरळावी. त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी किंवा धुरळणी करावी. रोगास प्रतिबंधक अशा जातींचा वापर करावा.
प्रा. वैभव प्रकाश गिरी
(सहायक प्राध्यापक) कृषि किटकशास्त्र विभाग, रामकृष्ण बजाज कृषि महाविद्यालय, पिपरी-वर्धा