बटाटा लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात सर्वच जिल्ह्यांत कमी-जास्त प्रमाणात आढळून येते. खासकरून पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर सह इतर जिल्ह्यात केली जाते. यामध्ये जे शेतकरी प्रथमच लागवड करत असतील त्याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बटाटा एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन कसे करायचे याबाबतची माहिती या लेखामध्ये दिली आहे.
कीड व रोग व्यवस्थापन
१) देठ कुडतरणारी अळी
राखाडी रंगाची अळी असून रात्रीच्या वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात. या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५% पावडर हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी.
अधिक वाचा: बटाट्याची काढणी व प्रतवारी कशी केली जाते?
२) मावा व तुडतुडे
या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. लागवडीनंतर १५ दिवसांनी मिथिल डिमेटॉन १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून किंवा फॉस्फोमिडान ८५ डब्लू एमसी १० मिली १० लिटर पाण्यात फवारावे.
३ ) बटाट्यावरील पंतग
हि किड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या किडीची सुरवात शेतातून होते. परंतु नुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या अळ्या पानात देठात व खोडात शिरून पोखरतात. अळ्या बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात. या किडीच्या बंदोबस्तासाठी कार्बारील ५० डब्लू.पी. १.५ किलो ७५० पाण्यात मिसळून फावरावे.
४) करपा
पानवर काळे ठिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात. डायथेनएम ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अधिक वाचा: बटाट्याची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी साठवणूक कशी करावी?
५) मर
मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात. बुंध्याजवळ जमिनीलगतच्या भागावर बुरशीची वाढ झालेली दिसते. पिकांची फेरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो. जमिनीत नॅप्थलीन किंवा फॉरमॅलिन (५:५०) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.
६) विषाणूजन्य (व्हायरस) रोग
हे रोग प्रामुख्याने बेण्याद्वारे किंवा रसशोषण करणाऱ्या किडीपासून (तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इ.) पसरतात. रोगट झाडाच्या पानांवर पिवळे ठिपके दिसतात आणि प्रमाण वाढल्यास पान पूर्ण पिवळे पडते व झाडाची वाढ खुंटते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगमुक्त बेणे वापरावे. रोगाची लक्षणे दिसल्यास झाड मुळासकट उपटून नष्ट करावे. शेतात स्वच्छता राखावी व रोगप्रसार करणाऱ्या किडींचे नियंत्रण करावे
७) चारकोल रॉट किंवा खोक्या रोग
या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ अंश सेल्सिअस पेक्षाअधिक असल्यास ते रोगजंतूंना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नासतात. जमिनीचे तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या वर चढण्यापूर्वी बटाट्याची काढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.
डॉ. अभय वाघ
प्राध्यापक, भाजीपाला शास्त्र विभाग
डॉ. प्रकाश नागरे
प्रा. उद्यानविद्या शाखा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला