गुलाबी बोंडअळींमुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. कपाशी पिकाची फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळींचे जीवनक्रम अखंडित चालू राहते. त्यामुळे पुढील वर्षी गुलाबी बोंडअळींचा होणारा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला.
राज्यात खरीप हंगामात सुमारे 42 लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील 23 हजार 265 हेक्टरवरील कपाशी लागवडीचा समावेश आहे. कापूस पिकाच्या वेचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे व पुढील वर्षी होणारा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. यासाठी कापूस पिकाची फरदड न घेता डिसेंबरअखेर पिकाचे अवशेष मुळासकट हाताने किंवा कॉटन थ्रेडरने काढावे. सर्व शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर कपाशी पीक काढून टाकावे. कपाशीची शेवटची वेचणी झाल्याबरोबर शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावी. कपाशीच्या फरदडामध्ये किडीच्या सुप्त अवस्था राहत असल्याने त्यांची गंजी करून बांधावर ठेवू नये, असे आवाहन करतानाच, पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी, असा सल्लाही वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी दिला.
फरदडमुक्त गाव करा!
कापूस फरदड निर्मूलन मोहीम घेऊन 3 डिसेंबर महिन्यात प्रत्येक कापूस उत्पादक गावात फरदडमुक्त गाव करावे. जिनिग, प्रेसिंग मिल, गोडाऊन, मार्केट यार्ड आणि कापूस खरेदी केंद्रे इ. ठिकाणी फेरोमेन ट्रॅप लावावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम खंडित करण्यासाठी 5 ते 6 महिने कापूस विरहित ठेवावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला.
किडींचा प्रादुर्भाव केव्हा वाढतो?
जिनिंग, प्रेसिंग मिल, गोडाऊन आणि मार्केट यार्ड या ठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घकाळ साठवणूक केली जाते. अशा साठवलेल्या कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्था पुढील हंगामात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकासाठी स्रोतस्थान म्हणून काम करतात. किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.