Join us

किटकनाशकांतील विषकारकता कशी ओळखाल?

By बिभिषण बागल | Published: September 07, 2023 3:31 PM

विषकारकतेनुसार किडनाशकांचे अति तीव्र विषारी, जास्त विषारी, मध्यम विषारी आणि किंचित विषारी अशा चार श्रेण्यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे.

किडनाशकांचे मानवी शरीर व पर्यावरणावर विपरीत दुष्परिणाम होत असून विषकारकतेनुसार किडनाशकांचे अति तीव्र विषारी, जास्त विषारी, मध्यम विषारी आणि किंचित विषारी अशा चार श्रेण्यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. अति तीव्र विषारी (वर्ग १) किडनाशकाच्या डब्यावर पतंगाच्या आकारात लाल त्रिकोण असून वरच्या बाजूस त्रिकोणात धोक्याचे चिन्ह व लाल अक्षरात विष (Poison) दर्शवलेले असते, तसेच जास्त विषारी श्रेणीमध्ये मोडणाऱ्या किडनाशकाच्या डब्यावर पतंगाच्या आकारात पिवळा त्रिकोण व त्रिकोणाच्या वरच्या बाजूस अक्षरात विष (Poison) दर्शवलेले असून ही किडनाशके जहाल विष गटात मोडतात.

मवाळ विषारी गटात मोडणारे मध्यम विषारी श्रेणीतील किडनाशकाच्या डब्यावर पतंगाच्या आकारात निळा त्रिकोण व त्रिकोणाच्या वरच्या बाजूस अक्षरात धोका (Danger) दर्शवलेले असते आणि किंचित विषारी श्रेणीतील किडनाशकाच्या डब्यावर पतंगाच्या आकारात हिरवा त्रिकोण व त्रिकोणाच्या वरच्या बाजूस अक्षरात दक्षता/सतर्क (Caution) दर्शविलेले असून ही किडनाशके मवाळ गटात मोडतात.

शेतकऱ्यांनी किडनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी ?१) किडनाशके परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत. खरेदी केलेल्या किडनाशकाचे विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे.२) लेबल क्लेम व शिफारस असलेले किडनाशक फवारणीसाठी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात खरेदी करावे.३) किडनाशके खरेदी करण्यापूर्वी लेबल (लीफलेट) किंवा माहिती पत्रिकेची मागणी विक्रेत्याकडे करून ते माहिती पत्रक व्यवस्थित वाचून/ऐकून समजून घ्यावे व पूर्ण सूचनांचे तंतोतंत पालन करावे.४) किडनाशके खरेदी करतेवेळी आवश्यक असलेला रासायनिक घटक पाहूनच खरेदी करावे.५) किडनाशकाचे उत्पादन तारीख व वापरण्याचा कालावधी पडताळून पाहावा, कालबाह्य झालेले किंवा आवेष्ठन खराब झालेले तसेच गळके डब्बे व पुडा असलेली किडनाशके खरेदी करू नयेत.

डॉ. प्रमोद नागोराव मगर शास्त्रज्ञ (कीटकशास्त्र)डॉ. सुरेश नेमाडे (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ)डॉ. प्रमोद यादगिरवार (सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, यवतमाळ, डॉ. पं.दे.कृ.वि, अकोला)

टॅग्स :शेतकरीपीक