खरिप तसेच रब्बी हंगामात लागवड करता येणारे मका हे अन्नधान्य, पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, मूल्यवर्धित पदार्थ असे बहुउपयोगी पीक आहे. खरिप हंगामात पावसाची अनिश्चितता तसेच पिकात होणारा अमर्याद गवताचा प्रादुर्भाव यामुळे मका पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मात्र खरिप हंगामात लागवड केलेल्या पिकाच्या तुलनेत रब्बी मक्याचे उत्पादन जवळपास दुप्पट मिळते. त्याचे कारण म्हणजे रब्बी हंगामात पिकाचे योग्य ते व्यवस्थापन करणे शक्य होते. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात वातावरण पिकासाठी अनुकूल असते आणि रोग-किडींचा प्रादुर्भावही तुलनेने कमी असतो.
जमिन आणि लागवडीचा कालावधीरब्बी हंगामात मका लागवडीची शिफारस केलेली वेळ १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर आहे. एखादा दुसरा आठवडा पेरणीस उशीर झाल्याने उत्पादनात फारसा फरक पडत नाही. मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, चांगली जलधारणा शक्ती आणि सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असलेली जमीन योग्य असते.
वाणमक्याचे संगम, कुबेर, राजर्षी, फुले महर्षी, महाराजा, बायो-९६८१, बायो-९६३७, एचक्यूपीएम-१, एचक्यूपीएम-५, पुसा संकर मका-१, विवेक संकरीत मका-२१, पुसा संकरीत मका-२७ हे संकरित व आफ्रिकन टॉल हा संमिश्र वाण लागवडीसाठी शिफारस केलेले आहेत.
बियाणे व बीजप्रक्रियाधान्यासाठीच्या मक्याच्या पेरणीकरिता १५ ते २० किलो आणि चाऱ्यासाठीच्या मका पेरणीकरिता ७५ किलो बियाणे १ हेक्टर क्षेत्रास पुरेसे होते. पेरणीपूर्वी २ ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक व २५ ग्रॅम ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धन प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
लागवडीचे अंतरउशिरा व मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या धान्यासाठी लागवड करावयाच्या वाणांची लागवड ७५×२० सें.मी. अंतरावर तसेच लवकर पक्व होणाऱ्या धान्यासाठी लागवड करावयाच्या वाणांची लागवड ६०×२० सेंटीमीटर अंतरावर टोकण पद्धतीने करावी.
खत व्यवस्थापनमका पिकास पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी ८८ कि. युरिया, ३७८ कि. सिंगल सुपर फॉस्फेट व ६८ कि. म्युरेट ऑफ पोटॅश खत द्यावे. पेरणीनंतर ३० ते ४५ दिवसांनी प्रत्येकी ८८ कि. युरिया प्रति हेक्टरी द्यावा. जमिनीत झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास पेरणीच्या वेळी हेक्टरी २०-२५ कि. झिंक सल्फेट द्यावे.
- डॉ. कल्याण देवळाणकर