जमिनीची सुपिकता तीन प्रकारची असते. भौतिक सुपिकता, रासायनिक सुपिकता, जैविक सुपिकता या परस्परावलंबी आहेत. भौतिक सुपिकता ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर पिकांसाठी जमिनीतील अन्नघटकांची उपलब्धता अवलंबून असते. जैविक सुपिकता ही भौतिक सुपिकतेवर अवलंबून असते. रासायनिक सुपिकता भौतिक व जैविक सुपिकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.
गांडूळखत करण्याच्या पद्धती:
गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी ४.२५ मीटर तर चार ढिगांसाठी ७.५० मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची १.२५ ते १.५० मीटर आणि मधल्या खांबांची उंची २.२५ ते २.५० मीटर ठेवावी. छप्परासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा.
१) ढीग पद्धत:
ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: २.५ ते ३.० मी. लांबीचे आणि ९० सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणार्या पदार्थांचा ३ ते ५ सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. दुसर्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर ३० ते ४० च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची ६० सें. मी. पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये ४० ते ५०% पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ ते ३० सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.
२) खड्डा पद्धत:
या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी ३ मीटर, रुंदी २ मीटर आणि खोली ६० सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा ३ ते ५ सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त ५० सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील.
गांडूळांच्या संवर्धनासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी:
- गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा आणि जवळपास मोठी वृक्ष/झाडे नसावीत.
- गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना, जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी.
- गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.
- एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत.
- बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रुंपासून गांडूळाचे संरक्षण करावे.
- संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३० अंश सेंटिग्रेडच्या दरम्यान ठेवावे.
- वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.
- मीठ, रासायनिक खते, कीटकनाशके यापासून गांडुळांना दूर ठेवावे.
- काच, प्लॅस्टिक, रबर, चिनी माती यांचा वापर करू नये.
- गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत, जेणेकरुन इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
खत तयार होण्यास लागणारा कालावधी:
गांडूळाचा वापर करून खत तयार होण्यास साधारणतः ३५ ते ५० दिवसाचा कालावधी लागतो.
गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत:
खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर व गांडूळखत हाताला भुसभुशीत व हलके लागते अशा स्थितीत गांडूळ खत तयार झाले असे समझावे. खत तयार झाल्याचे दिसून आल्यावर दोन दिवस पाणी मारणे बंद ठेवावे. म्हणजे वरचा थर कोरडा झाल्याने गंडूळे खाली जातात. पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बेडमधून बाहेर काढावे व त्यांचा बाहेर उन्हात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकाकृती ढीग करावा. म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाला जातील. ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. ३-४ तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बेडवर/खड्ड्यात सोडावीत आणि गांडूळांना खद्य पुरवून खताची निर्मीती सुरु ठेवावी. गांडूळखत वेगळे करताना कुदळी, टिकाव, फावडे, खुरपे, यांचा वापर करुन नये, जेणे करुन गांडूळांना इजा पोहोचणार नाही. या गांडूळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्याची विष्टा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे खत शेतामध्ये वापरता येते.
श्री. राजेंद्र सिताराम वावरे
विषय विशेषज्ञ (मृदा शास्त्र)
श्री. विश्वाभंर जाधव
कार्यक्रम सहाय्यक
कृषी विज्ञान केंद्र,कणेरी, कोल्हापूर