कापूस पीक सद्यस्थितीत बोंड विकसित तसेच परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. वर्धा जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पडलेला अतिपाऊस, ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रतेमुळे कापूस पिकावर बोंडसड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पात्या, फुले व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत पोषक वातावरणामुळे तसेच रोगकारक बुरशी, जिवाणू, रस शोषण करणारे कीटक (फुलकिडे व तुडतुडे) व हिरव्या करड्या लाल रंगाचे ढेकूण हे सदर रोगाचा प्रादुर्भावास करणीभूत असतात. त्याकरिता शेतकरी बांधवांनी कपाशीचे सर्वेक्षण करून बोंडसड रोगाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्या वतीने शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.
बोंड सडण्याचे प्रकार व लक्षणे
बाह्य बोंडसड: बोंडे उमलण्याच्या प्राथमिक अवस्थेत काही रोगकारक बुरशी व काही प्रमाणात बोंडावरील करपा रोगाला करणीभूत जिवाणूमुळे प्रादुर्भाव आढळून येतो. बहुतेक वेळा बोंडवर बुरशीची वाढ झाल्याचे दिसून येते.
आंतरिक बोंडसड: बोंडावरील पाकळ्या चिकटून राहिल्यामुळे बोंडच्या पृष्ठभागावर ओलसरपणा राहतो. अश्या ठिकाणी जिवानुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते. कळ्यांवर व बोंडांवर रस शोषण करणारे ढेकूण यांचा प्रादुर्भावामुळे आंतरिक बोंड सडण्याची समस्या दिसून येते. बोंडाच्या बाह्य भागावर बुरशीची वाढ साधारणता आढळून येत नाही. अशी बोंडे फोडून पाहीली असता जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे आतील रुई पिवळसर ते गुलाबी तपकिरी रंगाची किंवा डागाळलेली दिसून येते.
एकात्मिक व्यवस्थापन
- नत्रयुक्त खताचा अतीवापर टाळावा व कापूस पिकाची अतीवाढ रोखावी.
- शेतातून पाण्याचा योग्य निचरा होण्याची सोय करावी. पात्या, फुले व बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत रस शोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन करावे.
- आंतरिक बोंडसड करिता कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्ल्यु. पी. २५ ग्राम अधिक स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट १ ग्रॅम किंवा बाह्य बोंडसड करिता प्रोपीकोनाझोल २५ ई. सी. १० मिली किंवा पायऱ्याक्लोस्ट्रोबिन २०% डब्ल्यु.जी. १० ग्रॅम किंवा मेटिराम ५५ % अधिक पायऱ्याक्लोस्ट्रोबिन ५% डब्ल्यु.जी. यापैकी कुठलेही एक बुरशीनाशक १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
डॉ. जीवन कतोरे
कृषि विज्ञान केंद्र, वर्धा (सेलसुरा) पो. सेलसुरा, ता. जि. वर्धा