Join us

हवामान बदल आणि द्राक्ष पिकातील घडकुज कसे कराल व्यवस्थापन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 3:11 PM

कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याचे ऊन, तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष बागांतील घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या ठिपक्यांमुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे पाच हजार एकरांतील द्राक्ष बागांना फटका बसला आहे.

अशोक डोंबाळेसांगली : कधी पाऊस, कधी धुके, कधी कडाक्याचे ऊन, तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र हवामानामुळे द्राक्ष बागांतील घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या ठिपक्यांमुळे मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील सुमारे पाच हजार एकरांतील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. घडकुजमुळे जवळपास २५० कोटी रुपयांची द्राक्षे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली आहेत. जिल्ह्यात जवळपास एक लाख एकर द्राक्षबागांचे क्षेत्र आहे. नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार १५ हजार हेक्टर द्राक्षबागांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यापैकी तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच हजार एकरातील द्राक्षबागांवर काळे व तपकिरी रंगाचे ठिपके पडून द्राक्षाचे घड कुजून जात आहेत. पहिल्या दिवशी गुंठ्यातील द्राक्ष मण्यावर ठिपके पडल्यानंतर दोन दिवसात पूर्ण द्राक्ष बागांचेच नुकसान होत आहे. या पद्धतीने तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच हजार एकरातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.

घड कुजून बागेत वास येत असल्यामुळे शेतकरी द्राक्षमणी बागेतून बाहेर काढून टाकत आहेत. जवळपास २५० कोटी रुपयांचे द्राक्ष शेतकऱ्यांनी काढून बागेच्या बाहेर फेकले आहेत. उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत. या शेतकऱ्यांना खंबीर साथ देण्यासाठी शासनाने भरीव मदत करण्याची गरज आहे.

या उपाययोजना करा- जास्त खराब झालेले घड काढून टाकावेत. उर्वरित घडातील खराब मणी काढून फवारणी घ्यावी.- काढलेले घड, मणी शक्यतो बागेच्या बाहेर पुरस्रून टाकावेत. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव करणत्या घटकांची संख्या बागेत कमी होईल.- द्राक्ष बागेतील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी बागेतील आर्दतेचे प्रमाण कसे कमी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बागेत खेळती हवा ठेवल्यास रोगाच्या वाढीला आळा बसेल.- ज्या यागा अजूनही निरोगी व स्वच्छ आहेत, अशा बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा ऑपिलोमायसिस या जैविक बुरशीनाशकांची ३ दिवसांच्या अंतराने ३ ते ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

याकडे द्राक्ष बागायतदारांनी लक्ष द्यावेरोग नियंत्रणात आणण्यासाठी निर्यात द्राक्ष बागांसाठी बॅसिलस सबटिलिस दोन ग्रॅम प्रतिलिटर किंवा ट्रायकोडर्मा एसपी दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा दोन मिलि प्रति लिटर जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा, अशी शिफारस संशोधक अधिकाऱ्यांनी केली आहे. इतर बागांकरिता कासुगामायसिन अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड ७५० ग्रॅम प्रति हेक्टरी शिफारस आहे. बुरशीजन्य ठिपक्यांबाबत (ऍन्ट्रकनोज) हेक्साकोनाझोल एक मिलि प्रति लिटर वापरावे.

द्राक्ष संशोधन केंद्राचे अधिकारी म्हणतात..ऑक्टोबर फळ छाटणीनंतर मणी तयार झालेल्या बागांमध्ये गेल्या पंधरा दिवसापासून जिवाणूजन्य करप्याची नव्याने लक्षणे दिसून येत आहेत. या लक्षणांमध्ये प्रामुख्याने मण्यांच्या टोकावर व मण्यांवर काळे तपकिरी लहान, गोलाकार ठिपके आणि मणी कुज व मणी कोरडे होणे ही लक्षणे दिसून येत आहेत. सदर रोग हा बुरशी व जिवाणू प्रजातीच्या प्रादुर्भावामुळे होत आहे, असे मत मांजरी, जि. पुणे येथील द्राक्ष संशोधन कैटातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

काळ्या ठिपक्यामुळे दाक्षबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना मदत द्यावी. - रायगोंडा पाटील, संचालक, दाक्ष बागायतदार संघ

टॅग्स :द्राक्षेपीकशेतकरीसांगलीपाऊस